...आजीच्या अस्थिविसर्जनावेळी गहिवरला चंदू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 मार्च 2017

त्या धक्‍क्‍याने आजीचे झाले निधन

चंदू चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेल्याचे व तेथील लष्कारने त्याला ताब्यात घेतल्याची माहिती मिळताच त्या धक्‍क्‍याने त्याचा लहानपणापासून सांभाळ करणाऱ्या आजीचे निधन झाले. तो सुरक्षितपणे भारतात परत आल्यावर त्याच्या हस्तेच आजींच्या अस्थींचे विसर्जन करण्याचे चव्हाण कुटुंबीयांनी ठरविले होते.

नाशिक : पाकच्या हद्दीत चुकून गेलेल्या धुळ्याच्या चंदू चव्हाण यांनी आज दुपारी दीडला भाऊ व कुटुंबीयांसह उपस्थिती लावत लाडक्‍या आजीचे अस्थिविसर्जन रामकुंडात केले. त्या वेळी आजीच्या आठवणीने त्यांना अश्रू अनावर झाल्याने उपस्थित साऱ्यांचीच मने हेलावली. चंदूच्या आई-वडिलांचे छत्र लहानपणीच हरविल्याने याच आजीने त्याला लहानाचे मोठे केल्याची आठवण बहीण मंगला पाटील यांनी रामकुंडावर हुंदके आवरत सांगितली.

सीमेवरील जम्मू काश्‍मीरमधील वाढत्या अतिरेकी कारवायांना लगाम घालण्यासाठी भारतीय लष्कराने गतवर्षीच्या शेवटी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानच्या हद्दीत चुकून गेलेल्या धुळे येथील जवान चंदू चव्हाण यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे व परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी केलेल्या यशस्वी वाटाघाटीनंतर पाकिस्तान सरकारने मुक्तता करत भारताच्या हवाली केले. त्यानंतर लष्कराच्या ताब्यात असलेल्या चव्हाण यांचे नुकतेच धुळ्यात आगमन झाले.

दरम्यान, चंदू चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेल्याचे व तेथील लष्कारने त्याला ताब्यात घेतल्याची माहिती मिळताच त्या धक्‍क्‍याने त्याचा लहानपणापासून सांभाळ करणाऱ्या आजीने निधन झाले. तो सुरक्षितपणे भारतात परत आल्यावर त्याच्या हस्तेच आजींच्या अस्थींचे विसर्जन करण्याचे चव्हाण कुटुंबीयांनी ठरविले होते. आज दुपारी चंदू, भाऊ भूषण चव्हाण, बहीण मंगला पाटील, भाचे कुणाल व प्रशांत आदींचे दुपारी दीडला रामकुंडावर आगमन झाले. धुळे येथील पुरोहित महेश कुलकर्णी व अनिल दीक्षित यांनी पौरोहित्य केले. त्या वेळी "भारतमाता की जय', "चंदू चव्हाण जिंदाबाद' आदी घोषणांनी रामकुंड परिसर दणाणून गेला होता. या वेळी चंदूचे दोन्ही भाचे कुणाल व प्रशांत यांनी लाडक्‍या मामाला पेढेही भरविले. चंदूला पाहण्यासाठी रामकुंडावर गर्दी झाली होती.

आमचा भाऊ पुन्हा सुखरूप जिवंत परत येईल, यावर विश्‍वास नव्हता. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या अथक प्रयत्नांना यश येऊन भाऊ पुन्हा कुटुंबीयांत आल्याचा मोठा आनंद आहे.
- मंगला पाटील, जवान चंदू चव्हाणची मोठी बहीण

धुळे येथील जवान चंदू चव्हाण यांच्या सुटकेसाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरूच होते. त्याचवेळी धुळे येथील काहींनी त्यांच्या सुटकेसाठी नवदुर्गेला साकडे घातले होते. त्यांच्या प्रार्थनेमुळे चंदूची सुटका झाली.
- महेश कुलकर्णी, पुरोहित
 

Web Title: jawan chandu chavan emotional over granny's rituals