लग्नाच्या सुटीचा फोन आला अन् वाचले जवानाचे प्राण

लग्नाच्या सुटीचा फोन आला अन् वाचले जवानाचे प्राण

टाकळी ढोकेश्वर - काही तासांपूर्वी सहकाऱ्यांनी केलेली चेष्टा, सुटी मंजूर झाली म्हणून कौतुक करत त्यांनी घेतलेली गळाभेट, ठोकलेला कडक सॅल्यूट आणि हस्तांदोलन.... सगळे-सगळे क्षण त्याच्या भरल्या डोळ्यांतून तरळत होते. हे सगळे मित्र आता आपल्यात नाहीत, या दुःखातून तो तीन दिवस उलटूनही सावरलेला नाही. केवळ दैव बलवत्तर म्हणून ७६व्या बटालियनमधील जवान ठका बेलकर सोमवारी गुरवेवाडीकरांना (ता. पारनेर) दिसणार आहे.

पारनेर तालुक्‍यातील गुरवेवाडीतील गागरेझाप येथील ठका बेलकर हा २८ वर्षांचा तरुण सीआरपीएफच्या ७६व्या बटालियनमध्ये जम्मू-काश्‍मीरमध्ये तैनात आहे. येत्या रविवारी (ता. २४) त्याचे लग्न आहे. लग्नानिमित्त सुटी मिळावी, यासाठी त्याने काही दिवसांपूर्वीच अर्ज केला होता. मात्र, रजा मंजूर झाली नाही, तर कर्तव्यावर जावे लागेल, असे त्याला सांगण्यात आले. पत्रिका छापून झाल्या तरी रजा मंजूर न झाल्याने त्याने काश्‍मीर खोऱ्यात कर्तव्यावर जाण्याची तयारी केली. गुरुवारी (ता. १४) ठकाच्या ७६व्या बटालियनला काश्‍मीर खोऱ्याकडे कूच करण्याच्या सूचना मिळाल्या. बसमधून (एचआर ४९ एफ ०६३७) जाणाऱ्या सीआरपीएफच्या ४२ जवानांच्या यादीत ठकाचे नाव पंधराव्या क्रमांकावर आहे.  

बुधवारी उशीरा त्याला रजा मंजूर झाल्याचा मेसेज मिळाला. त्याच्या सहकाऱ्यांनी जल्लोष करत लग्नासाठी ठकाला शुभेच्छा देऊन त्याची गळाभेटही घेतली. पहाटे हे सहकारी निघण्यापूर्वी ठकाने त्यांना कडक सॅल्यूट ठोकला. छावणीवर त्याने गावी जाण्याची तयारी केली अाणि काही तासांनी आपल्या बसवर हल्ला झाल्याची व त्यात सगळे सहकारी हुतात्मा झाल्याची बातमी त्याला कळाली. तो सुन्न झाला. साक्षात मृत्यूच्या जबड्यातून परत आल्याची जाणीव ठकाला झाली. सर्व सहकाऱ्यांना गमावल्याच्या मानसिक धक्‍क्‍यातून तो अजूनही सावरलेला नाही.

काही तासांपूर्वी ज्या सहकाऱ्यांनी चेष्टामस्करी करत आपल्याला शुभेच्छा व निरोप दिला, ते सहकारी आता आपल्यात नाहीत, हे त्याचे मन खूप वेळ मान्य करत नव्हते. लग्नाची सुट्टी मिळाल्याचा ठकाचा आनंद काही तासांतच मावळला होता. रविवारी सायंकाळी उशीरा ताे अापल्या गावी पोचला. एरवी जंगी स्वागत करणारे अख्खे गाव या वेळी मात्र भरल्या डोळ्यांनी त्याला फक्त डाेळेभरून पाहत हाेते.

ठका एकुलता एक असूनही त्याला सैन्यात भरती केले. झालेली घटना दुर्दैवीच म्हणावी लागेल. ठका वाचल्याचा आनंद झाला; मात्र आपण इतर जवानांना गमावल्याचे दुःख त्यापेक्षा मोठे आहे. हुतात्मा जवानांचा अभिमान वाटतो. त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये.
- बाबाजी बेलकर, ठकाचे वडील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com