जिजामाता हायस्कूलच्या चिमुकलींनी पोलिसांसोबत साजरे केले रक्षाबंधन

वृत्तसंस्था
रविवार, 26 ऑगस्ट 2018

बहिण भावाच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. मात्र देश व समाजाच्या संरक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असलेल्या सैन्य दलातील जवान व पोलीस कर्मचाऱ्यांना रक्षाबंधन सण साजरा करता येत नाही. रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून येथील जिजामाता गर्ल्स हायस्कूलमधील चिमुकल्या विद्यार्थिनींनी प्रत्यक्ष सटाणा पोलीस ठाण्यात जाऊन पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राख्या बांधून हा सण साजरा केला.

सटाणा: बहिण भावाच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. मात्र देश व समाजाच्या संरक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असलेल्या सैन्य दलातील जवान व पोलीस कर्मचाऱ्यांना रक्षाबंधन सण साजरा करता येत नाही. रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून येथील जिजामाता गर्ल्स हायस्कूलमधील चिमुकल्या विद्यार्थिनींनी प्रत्यक्ष सटाणा पोलीस ठाण्यात जाऊन पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राख्या बांधून हा सण साजरा केला.

सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांना वेळेचे बंधन नसते. समाजासाठी आपल्या भूमिका बजावताना अनेकदा पोलिसांना आपल्या कुटुंबियांना वेळ देणे शक्य होत नाही. अनेक सणवार त्यांना कुटुंबियांसोबत साजरे देखील करता येत नाहीत. त्यामुळे यंदा हा सण पोलिसांसोबत साजरा करावा, अशी संकल्पना प्राचार्या एस. बी. मराठे यांनी मांडली. या उपक्रमात सर्व विद्यार्थिनी व शिक्षिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. आज सकाळी नऊ वाजता प्राचार्या श्रीमती मराठे यांनी विद्यार्थिनी व शिक्षिकांसह पोलीस ठाणे गाठले.

यावेळी विद्यार्थिनींनी स्वतः तयार केलेल्या राख्या पोलीस निरीक्षक वासुदेव देसले तसेच इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांना बांधल्या. या चिमुकल्या विद्यार्थिनींनी राखी बांधल्याने सर्वच पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांना भारावले होते. पोलीस निरीक्षक देसले यांनी सर्व विद्यार्थिनींनी पेन भेट दिले. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

यावेळी उपमुख्याध्यापक बी. ए. निकम, पर्यवेक्षिका बी. बी. सावकार, एस. जे. देवरे, सी. झेड. गायकवाड, जे. एम. जाधव, व्ही. ए. खैरनार, एस. के. जाधव, आर. डी. कापडणीस, जे. आर. पाटील, ए. आर. सोनवणे, एस. बी. पाटील, यु. पी. चव्हाण, आर. के. आहेर, व्ह. एस. अहिरे आदींसह शिक्षक, विद्यार्थिनी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: jijamata High school student celebrates RakshaBandhan with Police Officers