कपाशीच्या 24 कंपन्यांच्या बियाणे विक्रीवर बंदी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 मे 2017

जळगाव - खरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात बीटी कपाशी बियाण्यांच्या पाकिटांचा पुरवठा झाला आहे. परंतु, काही दिवसांपूर्वी जालना जिल्ह्यात बोगस कापूस बियाणे विक्रीस आल्याचे उघडकीस आले होते. त्या अनुषंगाने राज्यातील विविध 24 कंपन्यांचे बियाणे विक्रीस बंदी घातल्याचे आदेश शासनाने दिले आहेत. मात्र, शेतकऱ्यांनी काही कंपन्यांच्या बियाण्यांवर बंदीविरोधात पवित्रा घेतला असून, शासनाने घातलेल्या बंदीबाबत शेतकऱ्यांमधून संताप व्यक्‍त केला जात आहे.

खरीप हंगामाला सुरवात होण्यापूर्वी हंगामपूर्व कपाशीची लागवड केली जात असते. त्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात आतापर्यंत साडेतीन लाख पाकिटे कापूस बियाण्यांचा पुरवठा झाला आहे. बियाणे पुरवठा होत असताना जालना जिल्ह्यात बोगस बियाणे विक्री होत असल्याचे उघडकीस आल्याने ज्या कंपन्यांचे बोगस बियाणे असल्याचे निदर्शनास आले, त्या कापूस बियाण्यांवर विक्रीस बंदीचे आदेश देण्यात आले आहेत.

कृषी संचालक, आयुक्त यांच्या सूचनेनुसार बोगस बीटी बियाण्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. या 24 कंपन्यांचे जिल्ह्यांत 29 हजार 200 पाकिटे बियाणे दाखल झाले असून, त्यापैकी 19 हजार 400 पाकिटांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आल्याची माहिती कृषी अधिकारी मधुकर चौधरी यांनी दिली. मात्र, जालना जिल्ह्यातील घटनेवरून जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करून दिले जात नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

बियाणे विक्रेत्यांची आज बैठक
खरीप हंगामाला सुरवात होत असताना जिल्ह्यात कोणत्या कंपनीची बियाणे उपलब्ध आहेत, यासह कृषी विषयक कायद्याची माहिती देण्यासाठी जिल्हा कृषी विभागातर्फे उद्या (ता. 16) पाळधी (ता. धरणगाव) येथील साईबाबा मंदिर परिसरात जिल्ह्यातील बी- बियाणे विक्रेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील बाराशे नोंदणीकृत बियाणे विक्रेते बैठकीला उपस्थित राहणार आहे. खत खरेदी केल्यानंतर शेतकऱ्यांचे ठसे व आधार कार्ड इपोस मशिनद्वारे संलग्नित करण्यात येणार असून, त्याद्वारे कंपनीला शासन अनुदान देणार असल्याची माहिती कृषी अधिकारी मधुकर चौधरी यांनी दिली.

या बियाण्यांवर बंदी
राशी 659, पायर सरफास, सुला ऍग्रो बायोटेक, अकोला कंपनीची एससीएच 22, अंकुर सीड्‌स नागपूर, बीजी 3034, कृषिधन 532, 641, सोलर ऍग्रीटेक राजकोट कंपनीचे सूरज व श्रीकांत हे दोन वाण, बायर बायो सीड्‌स आरसीएच 317, झायलम सीड्‌स हैदराबाद एनएसपी 999, रामा ऍग्री जेनेटिक एचआरसीएस 55, नुजीवीडू सीड्‌स अकोला एमसीएच 7326, किर्तीमान ऍग्रो जेनेटिक केसीएचएच 932, वर्षा, स्वा, बीटी 904, कावेरी सीड्‌स केसीएचएच 8152, 707, नाथ बायो जेनेटिकची सुरभी, विभा सीड्‌स पावर सुफल ऍण्ड बायोटेक एसएसबी 3, श्रीराम बायो जेनेटिक या बियाण्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.

Web Title: kapashi 24 company seed sailing ban