पीक कर्जाच्या अर्जांवर  15 दिवसांत कार्यवाही करा 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 29 मे 2018

पीक कर्जाच्या अर्जांवर 
15 दिवसांत कार्यवाही करा 

जळगाव : बॅंकांकडे कर्ज मागणीसाठी प्राप्त झालेल्या अर्जांवर 15 दिवसांच्या आत कार्यवाही करण्याचे निर्देश आज जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी दिले. तसेच यासंबंधी शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्‍चित करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी सर्व बॅंकांच्या अधिकाऱ्यांना दिला. 

पीक कर्जाच्या अर्जांवर 
15 दिवसांत कार्यवाही करा 

जळगाव : बॅंकांकडे कर्ज मागणीसाठी प्राप्त झालेल्या अर्जांवर 15 दिवसांच्या आत कार्यवाही करण्याचे निर्देश आज जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी दिले. तसेच यासंबंधी शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्‍चित करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी सर्व बॅंकांच्या अधिकाऱ्यांना दिला. 

जिल्हास्तरीय बॅंकर्स सल्लागार समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक पी. पी. गिलाणकर, जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, जिल्हा ग्रामीण विकास संस्थेचे प्रकल्प संचालक श्री. शिरसाट, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक साहेबराव पाटील, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे श्री. इखारे यांच्यासह विविध बॅंकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

श्री. निंबाळकर म्हणाले, की पीक कर्ज देताना शेतकरी कर्जमाफी योजनेचे लाभ घेतलेले शेतकरी तसेच एकरकमी समझोता योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनाही पीक कर्जाचे वाटप करावे. पीक कर्जाची मागणी केलेला जिल्ह्यातील एकही शेतकरी वंचित राहणार नाही, तसेच यासंबंधी शेतकऱ्यांच्या तक्रारी येणार नाही याची काळजी घ्यावी. राष्ट्रीयीकृत बॅंकांनी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यास पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांनी कर्जाची मागणी केल्यास त्यांच्या अर्जांवर तातडीने कार्यवाही करावी. लाभार्थी कर्जास पात्र असल्यास त्याचे कर्ज प्रकरण मंजूर करावे व अपात्र असल्यास तसे त्याला 15 दिवसांच्या आत कळविण्याचे निर्देशही त्यांनी दिले. बॅंकांनी कर्जदार शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी करून घेण्याबरोबरच बिगर कर्जदार शेतकऱ्यांनाही या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन करावे. 
----- 

मुद्रा कर्जाबाबत तक्रारी 
मुद्रा बॅंक योजनेबाबत अनेक बॅंका लाभार्थ्यांना कर्जाचे वाटप वेळेत करीत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. यावर बॅंकांनी मुद्रा बॅंक योजनेत पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्याचे आवाहन केले. तसेच विविध महामंडळांमार्फत बॅंकांकडे पाठविण्यात आलेल्या कर्ज प्रकरणांचा निपटारा बॅंकांनी तातडीने करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी दिल्या. 
..................
 
 

Web Title: kara