कर्डक कुटुंबीयांची पंचवटीत मोर्चेबांधणी

विक्रांत मते
बुधवार, 14 डिसेंबर 2016

नाशिक - पंचवटी विभागातील फुलेनगर परिसरात गेल्या पंचवार्षिकमध्ये कर्डक कुटुंबीयांचे वर्चस्व आहे. आतापर्यंत झालेल्या पाच पंचवार्षिक निवडणुकांमध्ये एक टर्म वगळता सातत्याने कर्डक कुटुंबाने वर्चस्व कायम ठेवले. एक किंवा त्यापेक्षा अधिक सदस्यीय प्रभाग असले, तरी कर्डक कुटुंबीयांनी या भागावरील दावा कधी सोडला नाही. यंदा चार सदस्यांचा प्रभाग झाल्याने प्रभागाच्या भौगोलिक हद्दीतही वाढ झाली. त्यामुळे फुलेनगर भागात वर्चस्व कायम ठेवताना इतर भागातूनही मतदान मिळवून महापालिकेत वर्चस्व कायम ठेवण्यासाठी कर्डक कुटुंबीयांचे प्रयत्न राहतील.

नाशिक - पंचवटी विभागातील फुलेनगर परिसरात गेल्या पंचवार्षिकमध्ये कर्डक कुटुंबीयांचे वर्चस्व आहे. आतापर्यंत झालेल्या पाच पंचवार्षिक निवडणुकांमध्ये एक टर्म वगळता सातत्याने कर्डक कुटुंबाने वर्चस्व कायम ठेवले. एक किंवा त्यापेक्षा अधिक सदस्यीय प्रभाग असले, तरी कर्डक कुटुंबीयांनी या भागावरील दावा कधी सोडला नाही. यंदा चार सदस्यांचा प्रभाग झाल्याने प्रभागाच्या भौगोलिक हद्दीतही वाढ झाली. त्यामुळे फुलेनगर भागात वर्चस्व कायम ठेवताना इतर भागातूनही मतदान मिळवून महापालिकेत वर्चस्व कायम ठेवण्यासाठी कर्डक कुटुंबीयांचे प्रयत्न राहतील. महापालिकेच्या विद्यमान विरोधी पक्षनेत्या कविता कर्डक यांच्यासह माजी नगरसेविका आशाताई व रुक्‍मिणीताई कर्डक यासुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्‍यता आहे.

वज्रेश्‍वरी झोपडपट्टी, फुलेनगर, भराडवाडी, सम्राटनगर, राहुलवाडी, कालिकानगर या भागातून कर्डक कुटुंबीयांनी सातत्याने विजय मिळविला. १९९२ च्या निवडणुकीत काँग्रेसकडून आशाताई कर्डक निवडून आल्या होत्या. पहिल्याच पंचवार्षिकमध्ये महिला बालकल्याण समितीवर काम करण्याची संधी त्यांना मिळाली होती. सलग दुसऱ्या टर्ममध्ये म्हणेज १९९७ मध्ये कर्डक कुटुंबातीलच रुक्‍मिणीताई कर्डक यांनी भाजपकडून उमेदवारी करत विजयदेखील मिळविला होता. याच पंचवार्षिकमध्ये पंचवटी प्रभाग समितीच्या सभापतिपदाचा मान त्यांना मिळाला होता. त्यानंतर २०१२ मध्ये या भागातून कर्डक कुटुंबाच्या सदस्यांना अपयश हाती आले. त्या काळी काँग्रेसचे चंद्रकांत निकम विजयी झाले होते. एक पंचवार्षिक हातून गेल्याने कर्डक कुटुंबाने पुन्हा जम बसवत २००७ मध्ये कविता कर्डक यांच्या रूपाने पुन्हा महापालिकेत एंट्री केली. त्या वेळी सौ. कर्डक यांनी बहुजन समाज पक्षाकडून निवडणूक लढविली होती. पंचवटी विभागात बसपला त्यांच्याच माध्यमातून विस्ताराला संधी मिळाली. याच पंचवार्षिकमध्ये बहुजन समाज पक्षाच्या गटनेत्या म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यानंतर मात्र सौ. कर्डक यांनी २०१२ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला व राष्ट्रवादीकडून पुन्हा निवडणूक लढविली. सलग दुसऱ्यांदा विजयी होण्याचा मान त्यांना मिळाला. याच पंचवार्षिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या आहेत. त्याचबरोबर महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या म्हणूनही त्या सध्या कार्यरत आहेत. कर्डक कुटुंबातील बाळासाहेब कर्डक यापूर्वी बहुजन समाज पक्षाचे प्रदेश महासचिव राहिले. सध्या महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.

वर्चस्वाची लढाई
महापालिकेच्या आतापर्यंत पाच निवडणुका झाल्या. त्यांपैकी चार निवडणुकांमध्ये कर्डक कुटुंबाने महापालिकेचे प्रतिनिधित्व केले. काँग्रेस, भाजप, बसप त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमार्फत कर्डक कुटुंबाने राजकीय अस्तित्व निर्माण केले. पक्ष कुठलाही असला तरी स्वतःच्या ताकदीवर कर्डक कुटुंबाने राजकीय यश मिळविले आहे. यंदा कविता कर्डक पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. गरज पडल्यास बाळासाहेब कर्डक हेदेखील ऐनवेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्‍यता आहे. यंदा चार सदस्यांचा प्रभाग झाल्याने माजी नगरसेविका आशाताई व रुक्‍मिणीताई कर्डक यादेखील प्रयत्नशील राहतील. झोपडपट्टी परिसरातील महिलांना बचतगटांमार्फत रोजगार मिळवून देणे व मूलभूत सुविधा देणे ही कर्डक कुटुंबीयांची ताकद आहे. याच ताकदीच्या जोरावर पुन्हा निवडणुकीच्या माध्यमातून राजकीय वर्चस्व निर्माण करण्याचे प्रयत्न राहणार आहेत.

Web Title: kardak family politics