केळीचे अर्थकारण संपविण्याचे षडयंत्र 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 6 जून 2018

केळीचे अर्थकारण संपविण्याचे षडयंत्र 

रावेरः खानदेशी केळीवर निपाह रोगाचे विषाणू असल्याची उत्तर भारतातील अफवा म्हणजे जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील केळीचे अर्थकारण उद्‌ध्वस्त करण्याचे षडयंत्र असल्याचे मत तज्ञांकडून व्यक्‍त होत असून, जिल्ह्यातील केळीवर निपाहच्या विषाणूंची शक्‍यताही त्यांनी फेटाळून लावली आहे. 

केळीचे अर्थकारण संपविण्याचे षडयंत्र 

रावेरः खानदेशी केळीवर निपाह रोगाचे विषाणू असल्याची उत्तर भारतातील अफवा म्हणजे जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील केळीचे अर्थकारण उद्‌ध्वस्त करण्याचे षडयंत्र असल्याचे मत तज्ञांकडून व्यक्‍त होत असून, जिल्ह्यातील केळीवर निपाहच्या विषाणूंची शक्‍यताही त्यांनी फेटाळून लावली आहे. 

निपाहचा व्हायरस केळीवर असल्याच्या अफवेमुळे उत्तर भारतात विशेषतः पंजाबमध्ये केळी खरेदी करण्यासाठी व्यापारी तयार नसल्याबद्दल "सकाळ'ने केळीतज्ञ के. बी. पाटील यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले, की निपाह रोगाचा नैसर्गिक प्रचारक म्हणजे वटवाघूळ. वटवाघळाने फळे कुरतडून खाण्यामुळे निपाहचे विषाणू फळात शिरतात. आपल्या जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेशात जी केळी उत्पादित होते, तिथे वटवाघूळच काय पण पोपटासारखे पक्षीही कधी केळी खात नाहीत. त्यामुळे केळीत निपाहचा विषाणू असण्याची अजिबात शक्‍यता नाही. 

दिल्ली समितीचे आवाहन 
दिल्ली (नया आझादपूर) बाजार समितीचे सचिव तेजिंदरसिंह माकन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, की जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील केळी बागा आम्ही पाहिल्या आहेत. इथले शेतकरी केळी बागा इतक्‍या स्वच्छ ठेवतात, की कोणतेही पक्षी अथवा वटवाघूळ यात जाण्याची आणि केळी खाण्याची सुतराम शक्‍यता नाही. त्यामुळे निपाहच्या अफवेवर विश्वास ठेवू नये. त्यांनी आपला संदेश सोशल मीडियावरही प्रसारित केला आहे. 

सर्वपक्षीय एकत्र 
यावर्षी खानदेशातील केळी मोठ्या प्रमाणावर आखाती देशात निर्यात झाली. म्हणून आपल्याकडील केळीला बदनाम करण्याच्या षडयंत्राचा हा एक भाग असल्याचे दिसून येत आहे. या अफवेबाबत कळताच सर्व पक्षीय कार्यकर्ते एकत्र आले, हे महत्त्वाचे आहे. इतकेच नव्हे, तर असा काही प्रकार नसल्याचा ठाम विश्वास असल्याने केळीची तपासणी करून घेण्याचा निर्णयही झाला आहे. केळीचे गेल्या चार महिन्यातील नीचांकी भाव, गेल्या आठवड्यात केळीला वादळाचा बसलेला सुमारे शंभर कोटी रुपयांचा फटका, उत्तर भारतात सुरू असलेला संप या पार्श्वभूमीवर केळी उत्पादक शेतकऱ्यांनी घाबरून न जाता आपापल्या परीने या अफवेबाबत निराकरण करण्याचा प्रयत्न करावा, असे मतही तज्ञांनी व्यक्त केले आहे. 
... 

निपाह या रोगाच्या व्हायरसचा प्रसार हा वटवाघूळ या पक्षापासून होतो. केळीचे फळ हे कच्चे असताना त्याची चव तुरट असते. त्यामुळे वटवाघूळच काय अन्य कोणताही पक्षी केळी कधीच खात नाही. 
- के. बी. पाटील, 
केळीतज्ञ, जळगाव 
... 
केळीवर निपाहची अफवा पसरविणाऱ्यांना वकिलांमार्फत नोटीस द्यायला हवी. जळगाव जिल्ह्यातील केळी बागादेखील स्वच्छ असल्याचे येथील केळी खाण्यासाठी सुरक्षित आणि आरोग्यासाठी उपयुक्तच आहे. 
- तेजिंदरसिंह माकन 
सचिव, आझादपूर बाजार समिती, दिल्ली 
 

Web Title: keliche