खान्देशात आखाजीचा उत्साह..

खंडू मोरे
गुरुवार, 5 एप्रिल 2018

खामखेडा (नाशिक) - अक्षय्यतृतीया म्हणजे आखाजीचा सण खान्देशात तसेच कसमादे पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो. या सणाच्या आधी पंधरा दिवस चैत्र पौर्णिमेला घरोघरी पारंपरिक पद्धतीने गौराईची स्थापना करतात. गौराई विसर्जनाचा सण म्हणूनही देखील आखाजीचे महत्त्व आहे. धावपळीच्या काळात देखील कसमादे सह खान्देश भागात गौराईची स्थापना झाली असून, आजही ग्रामीण भागात ही परंपरा टिकून आहे.

चैत्र पौर्णिमेला गौराईची स्थापना केली जाते. चंदनाच्या लाकडापासून गौराई बनवलेली असते. एक फुट लांबीचे दोन लाकडावर अश्वाचे चित्र कोरून ते आडव्या लाकडाने एकत्र केलेले असतात व खालच्या बाजूला सफाट फळी लाऊन या फळीवर महादेवाची पिंड कोरलेली असते. पाटावर नव्या कापडावर गौरीचा स्थापना केली जाते. अश्व आकाराच्या गौराईला लालसर पांढऱ्या गुंजा मेणाने चिटकवतात व चंदनाचे गंध लावतात. शेंगा व गव्हाच्या पिठाच्या पुतळ्याची माळ घालतात. मुरमुरे व लाह्यांनी सजावट करत ज्या ठिकाणी गौराई बसवायची असते त्या ठिकाणी कलश ठेवतात. कैरी असणारी नवी पालवी फुटलेली डहाळी ठेवतात.  

गौराई स्थापना झाल्यावर प्रत्येक घरासमोरच्या झाडांना झोके बांधले जातात. झोक्यावर बसणाऱ्या सासुरवाशिणी गौराईची व आखाजीची गाणी म्हणत झोके घेतात.‘धव्व्या घोडा सटांग सोडा गवराई सासरी जाय वो, ‘खडक फोडू झिलप्या काढू पाणी झुईझुई व्हाय वो’ किंवा आथानी कैरी तथानी कैरी कैरी झोका खाये वं माय, कैरी तुटी खडक फुटणा झुळझुळ पाणी वाहे वं माय अश्या स्वरुपाची शेकडो गाणी कानावर पडतात.

आखाजीच्या (अक्षय तृतीया) दिवशी गौराईचे भात, सार, कुरडया, आंब्याचा, पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. या दिवशी गौराई उठवली जाते. आधुनिक काळात देखील खान्देशात घरोघरी गौरीईची स्थापना केली आहे.

खान्देशात घरोघरी पारंपरिक पद्धतीने चैत्र पौर्णिमेला गौराई बसवितात. पूर्वी मोठ्या उत्सहात हा सण साजरा होत असे, मात्र आधुनिक काळात ही परंपरा कालबाह्य होत आहे. या सांस्कृतिक परंपरेचे जतन होण्यासाठी मुली व महिलांना या सणाचे महत्व सांगत गौराईची स्थापना करण्यासाठी जागृती करत आपला सांस्कृतिक वारसा टिकवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
सरोज नवले, पवार, प्राथमिक शिक्षिका मालेगाव आहोत.

Web Title: khandesh akshaya tritiya tradition