खुटपाडा खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप; आरोपीच्या पत्नीची साक्ष ठरली महत्त्वाची 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 जुलै 2018

आरोपी रामदास आहेर याची पत्नी लक्ष्मीची साक्ष जशी महत्त्वाची ठरली तशीच, मोबाईलची तांत्रिक माहितीचा सबळ पुराव्याच्या आधारे जिल्हा व सत्र न्यायधीश एन. जी. गिमेकर यांनी दोघा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. 

नाशिक : नांदगाव कोहली पैकी खुटपाडा (ता. त्र्यंबकेश्‍वर) येथे दिवाळीच्या वेळी झालेल्या भांडणाची कुरापत काढून एकाचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी दोघांना जन्मठेप व 7 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. 5 डिसेंबर 2015 ला रात्री घडलेल्या घटनेत आरोपी दशरथ किसन जाधव, रामदास पांडुरंग आहेर यांनी सुभाष काळू गावित (28) याचा गळा आवळून खून केला होता. याप्रकरणी आरोपी रामदास आहेर याची पत्नी लक्ष्मीची साक्ष जशी महत्त्वाची ठरली तशीच, मोबाईलची तांत्रिक माहितीचा सबळ पुराव्याच्या आधारे जिल्हा व सत्र न्यायधीश एन. जी. गिमेकर यांनी दोघा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. 
 
याप्रकरणी हरसुल पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल होता. मृत सुभाष काळू गावित याचे आरोपी रामदास आहेर व दशरथ जाधव यांच्याशी भांडण झाले होते. त्या भांडणाची कुरापत काढून दोघ आरोपींनी सुभाष गावित यास 5 डिसेंबर 2015 च्या रात्री 8:30 वाजता गावाबाहेरील भात शेतात बोलाविले. त्यासाठी दोघांनी त्याचा दोराच्या सहाय्याने गळा आवळून खून केला होता. त्यानंतर ते पसार झाले होते. दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह सापडला होता. याप्रकरणी हरसुल पोलीसात खूनाचा गुन्हा दाखल होऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक पी.पी. सांळुंखे यांनी तपास करून दोघा आरोपींना अटक केली होती. 

याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायधीश एन. जी. गिमेकर यांच्यासमोर खटला चालला. सरकारी पक्षातर्फे अॅड. रवींद्र निकम यांनी कामकाज पाहताना, 10 साक्षीदार तपासले. यामध्ये आरोपी रामदास आहेर याची पत्नी लक्ष्मी आहेर हिची साक्ष व मोबाईलची तांत्रिकी माहितीचे सबळ पुरावे न्यायालयासमोर आले. त्याआधारे न्या. गिमेकर यांनी दोघा आरोपींना जन्मठेप व 5 हजार रुपये, कलम 201 अन्वये 7 वर्षे सक्तमजुरी व 2 हजार रुपये दंड याप्रमाणे शिक्षा ठोठावली आहे. 

लक्ष्मीचे हस्ताक्षर व साक्ष -
आरोपी रामदास आहेर व दशरथ जाधव यांनी सुभाष गावित याचा खून केल्यानंतर त्याचा मृतदेह 1 कि. मी. अंतरावरील शेतात नेऊन टाकला. त्यामुळे पोलिसांना त्या घटनास्थळावरून काहीही धागेदोरे मिळाले नव्हते. आसपास शोथ घेतल्यानंतर 1 कि.मी. अंतरावर त्यांना तुटलेला मोबाईल, सीमकार्ड, गावितच्या चपला असे महत्त्वाची पुरावे मिळाले. तसेच, आरोपी आहेर याने खून केल्यानंतर घरी आला. पत्नी लक्ष्मीकडून त्याने एक चिठ्ठी लिहिली. त्यामध्ये गावातील अनेकांची नावे होती, व त्या साऱ्यांचा खून केला जाईल असे म्हटले होते. ती चिठ्ठी आरोपींनी मृत गावितच्या खिशात ठेवली होती. पोलिसांच्या हाती ती चिठ्ठी लागल्यानंतर त्यांनी शोध घेतला. मोबाईलच्या तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी अटक केल्यानंतर लक्ष्मीने चिठ्ठी लिहिल्याचे समोर आले. त्यासाठी हस्ताक्षर तज्ज्ञांकडून अहवाल घेऊन तो न्यायालयासमोर मांडला. तसेच, लक्ष्मीनेही न्यायालयात साक्ष दिल्याने आरोपींवरील खुनाचा आरोप सिद्ध होण्याची बळ मिळाले.
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Khutpada murder case punishment of life prison