अन्‌ कृष्णा अडखळत बोलू लागला हरिपाठ

विजयसिंह गिरासे 
गुरुवार, 24 जानेवारी 2019

चिमठाणे - आठ वर्षांचा कृष्णा. शरीर कमजोर, पण मनात जिद्द अन्‌ आत्मविश्‍वास. अडखळत बोलत का असेना, पण हरिपाठात तल्लिन होऊन सर्व शाळेचे लक्ष वेधून घेतोय. सध्या तो दररोज शाळेत येत असून, त्याला शाळेची गोडी लागली, हेच समावेशित शिक्षणाचे यशच म्हणावे लागले. हा आशेचा किरण आहे तामथरे (ता. शिंदखेडा) केंद्रातील जिल्हा परिषद शाळा आरावे येथील दुसरीत शिक्षण घेणाऱ्या सेरेबल पाल्सीग्रस्त कृष्णा आननसिंग गिरासे.

चिमठाणे - आठ वर्षांचा कृष्णा. शरीर कमजोर, पण मनात जिद्द अन्‌ आत्मविश्‍वास. अडखळत बोलत का असेना, पण हरिपाठात तल्लिन होऊन सर्व शाळेचे लक्ष वेधून घेतोय. सध्या तो दररोज शाळेत येत असून, त्याला शाळेची गोडी लागली, हेच समावेशित शिक्षणाचे यशच म्हणावे लागले. हा आशेचा किरण आहे तामथरे (ता. शिंदखेडा) केंद्रातील जिल्हा परिषद शाळा आरावे येथील दुसरीत शिक्षण घेणाऱ्या सेरेबल पाल्सीग्रस्त कृष्णा आननसिंग गिरासे.

दोन्ही पाय वाकलेले 
चिमठाणे गावापासून जवळच असलेल्या आरावे येथील जिल्हा परिषद शाळेत कृष्णा दुसरीमध्ये शिकत असून, तो सेरेबल पाल्सीने ग्रस्त आहे. त्याचे दोन्ही पाय वाकलेले असून, तो शाळेत दाखल झाला तेव्हा जमिनीवर सरपटत येत असे. वर्गशिक्षक त्याची नेहमी काळजी घेत. कृष्णा एक दिवस नक्की चालायला शिकेन, हा आत्मविश्वास शिक्षकांना होता.

अडखळत चालू लागला
शिंदखेडा पंचायत समिती समावेशित शिक्षण विभागांतर्गत गटशिक्षणाधिकारी मनीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दोंडाईचात गेल्यावर्षी श्री फिजिओथेरपी सेंटरमध्ये शिबिर झाले. त्याची माहिती शिक्षकांना दिल्यानंतर त्या ठिकाणी कृष्णाला घेऊन त्याचे काका आले. तेथील फिजिओथेरपी सराव पाहून नंतर दररोज कृष्णाचे काका घरी सराव करू लागले व काही दिवसानंतर कृष्णाच्या चालण्यामध्ये फरक जाणवला व कृष्णा हळूहळू चालू लागला. यामुळे कृष्णाच्या आई-वडील, काका, शिक्षकांना खूप आनंद झाला.

समावेशित शिक्षणाचे यश
कृष्णाला भाऊ, बहीण असून, आई सरलाबाई गिरासे गृहिणी, तर वडील आननसिंह, काका भटेसिंह प्रगतिशील शेतकरी आहेत. कृष्णाच्या शाळेतील शिक्षक जितेंद्र आव्हाड यांच्या प्रशिक्षणाचा लाभही कृष्णाला होत असून, त्याला शिबिरांतर्गत कॅलिपर बूट मिळाले आहे, आता तो दररोज शाळेत येत असून, त्याला शाळेची चांगलीच गोडी लागली आहे. हे केवळ समावेशित शिक्षणामुळेच शक्‍य झाले आहे.

कृष्णा हा लहान भावाचा मुलगा असून, तो जन्मतः दिव्यांग आहे. त्याला थेरेपी सेवेमुळे चालता यायला लागले. आरावे शाळेतील मुख्याध्यापक पुना नगराळे व सर्व शिक्षक, गटसाधन केंद्रातील समावेशित शिक्षण विभागाचे आम्ही आभारी आहोत.
- भटेसिंह ओंकारसिंह गिरासे, कृष्णाचे काका, आरावे, ता. शिंदखेडा

दिव्यांग कृष्णाची माहिती समावेशित शिक्षण विभागाकडून घेतल्यानंतर त्याला थेरेपी सेवा सुरू केली. थेरेपी सेवेमुळे कृष्णाच्या चालण्यात बदल झाला. तो सामान्य मुलांसमवेत शिक्षणाच्या प्रवाहात नियमित शाळेत येऊ लागला. भविष्यात कृष्णाला शिक्षण विभागाकडून सर्व मदत केली जाईल.
- मनीष पवार, गटशिक्षणाधिकारी, शिंदखेडा

Web Title: Krishna began to speak haripath