उमेदवारांचा सांगावा जाताच कष्टकरी कर्मभूमीत परतले

वृत्तसंस्था
शुक्रवार, 12 मे 2017

नोव्हेंबर महिन्यात झालेल्या नोटाबंदीमुळे येथील यंत्रमाग व्यवसाय ठप्प झाला. जवळपास निम्मे यंत्रमाग महिनाभर बंद होते. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती

मालेगाव - यंत्रमाग हा शहराचा आत्मा आहे. नोटाबंदीनंतर येथील यंत्रमागाचा खडखडाट मंदावल्याने मूळचे उत्तर प्रदेश, बिहारमधील जवळपास 25 हजार यंत्रमाग कामगार आपल्या मूळगावी परतले होते. व्यवसाय पूर्वपदावर आल्याने व महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्याने हे कामगार पुन्हा मालेगावी परतले आहेत. उमेदवारांचा सांगावा जाताच कष्टकरी आपल्या कर्मभूमीत आल्याने मतदानाची टक्केवारी वाढू शकेल.

उत्तर प्रदेश व बिहारमधील हजारो कुटुंबे येथे स्थलांतरित झाली आहेत. रोजीरोटीसाठी आलेल्या या कुटुंबीयांच्या तीन ते चार पिढ्या येथे राहिल्या. मालेगावशी त्यांचे नाते जुळले आहे. यातील बहुतांशी कामगार यंत्रमागावर मजुरी करतात. अनेकांनी येथे घरे बांधली असून, नातेसंबंध मालेगावातच झाले आहेत. वर्षातून एक-दोन वेळा हे कामगार आपल्या मूळगावी जातात. नोव्हेंबर महिन्यात झालेल्या नोटाबंदीमुळे येथील यंत्रमाग व्यवसाय ठप्प झाला. जवळपास निम्मे यंत्रमाग महिनाभर बंद होते. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. यंत्रमाग व्यवसाय पूर्वपदावर येण्यास मोठा वेळ लागणार होता. त्यामुळे डिसेंबर महिन्यात हजारो कामगार उत्तर प्रदेश व बिहारमधील आपल्या मूळगावी परतले होते.

सध्या यंत्रमाग व्यवसाय अडचणीतून मार्ग काढत आहे. जवळपास 90 टक्के यंत्रमाग आठवड्यातून सहा दिवस सुरू असतात.

व्यवसाय पूर्वपदावर आल्याने महिन्यापासून या कामगारांनी येथे परतण्यास सुरवात केली होती. मात्र रणरणते ऊन पाहता मेनंतर परतण्याचा विचार बहुसंख्य कामगार करीत होते. त्यातच महापालिका निवडणूक जाहीर झाल्याने उमेदवारांनी राहिलेल्या कामगारांशी संपर्क साधल्याने ते पुन्हा शहरात परतत आहेत. कडक उन्हामुळे मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी महापालिका प्रशासन जनजागृती करीत आहे.

Web Title: labours return to malegaon