गिरणेचे पूरपाणी ओसरले... 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

तीन दिवसांपासून पाऊस थांबल्याने गिरणा नदीचे पूरपाणी ओसरले आहे. चणकापूर, पुनंद व केळझर या तिन्ही धरण क्षेत्रांत पावसाने बऱ्यापैकी विश्रांती घेतल्याने धरणातील विसर्ग कमी झाला आहे.

मालेगाव : कसमादे परिसरात तीन दिवसांपासून पाऊस थांबल्याने गिरणा नदीचे पूरपाणी ओसरले आहे. चणकापूर, पुनंद व केळझर या तिन्ही धरण क्षेत्रांत पावसाने बऱ्यापैकी विश्रांती घेतल्याने धरणातील विसर्ग कमी झाला आहे. मंगळवारी (ता. १) चणकापूरमधून ११४, केळझरमधून ७५, पुनंदमधून ३३५ तर ठेंगोडा उंचावणीच्या बंधाऱ्यावरून एक हजार २१८ क्‍यूसेक पाणी गिरणा नदीत वाहत आहे. हरणबारीतून २५१ क्‍यूसेक पाणी वाहत असल्याने मोसमचे पाणीही कमी झाले. 

पाणलोट क्षेत्रात यंदा मुबलक पाऊस
कसमादेतील सर्वच धरणांच्या पाणलोट क्षेत्रात यंदा मुबलक पाऊस झाला. चणकापूर, पुनंद व केळझर या तिन्ही धरणांतून मोठ्या प्रमाणावर विसर्ग झाल्याने गिरणा नदी जवळपास तीन महिन्यांपासून वाहत आहे. हरणबारी धरण ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात ओव्हरफ्लो झाल्यानंतर मोसम नदीला तीन मोठे पूर आले. गिरणा व मोसम नद्यांच्या पूरपाण्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील सर्वांत मोठे असलेले गिरणा धरण तब्बल अकरा वर्षांनंतर ओव्हरफ्लो झाले. दोन्ही नद्यांचा पूरपाण्याचा फायदा कसमादेतील विविध पाणीपुरवठा योजनांना होत आहे. जवळपास सर्वच पाणीपुरवठा योजनांचे तलाव, विहिरी पूरपाण्याने भरून घेतल्या आहेत. 

बाजरी कापणी वेगाने सुरू 
तीन दिवसांपासून पाऊस थांबल्याने गिरणेचे पाणी ओसरले आहे. पुनंद, केळझर व हरणबारी ही तिन्ही धरणे ओव्हरफ्लो आहेत. चणकापूर धरणाचा साठा ९९ टक्‍क्‍यांवर नियंत्रित करण्यात आला आहे. तुडुंब भरलेल्या गिरणा धरणातून दोन हजार ५०० क्‍यूसेक पाणी गिरणा नदीत सोडले जात आहे. पाऊस थांबल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. बाजरी कापणी वेगाने सुरू आहे. पाऊस थांबला, तरी कसमादे परिसरात ऊन- सावलीचा खेळ सुरू आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: less water flowed of girna river