प्राध्यापकाकडून नळसिंचन पद्धत विकसित

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 जानेवारी 2019

सायगाव - कमी पाण्यात पिकांची गरज भागविणासाठी फरताळवाडी (ता. येवला) येथील प्रा. संदीप फरताळे यांनी स्वतंत्रज्ञानाने नळसिंचन पद्धत विकसित केली. प्राध्यापक असूनही मातीत राबणाऱ्या फरताळे यांनी या पद्धतीचे पेटेंटही मिळविले आहे.

सायगाव - कमी पाण्यात पिकांची गरज भागविणासाठी फरताळवाडी (ता. येवला) येथील प्रा. संदीप फरताळे यांनी स्वतंत्रज्ञानाने नळसिंचन पद्धत विकसित केली. प्राध्यापक असूनही मातीत राबणाऱ्या फरताळे यांनी या पद्धतीचे पेटेंटही मिळविले आहे.

तालुक्‍यातील उत्तर-पूर्व भागाच्या माथी कायमच दुष्काळाचा टिळा लागलेला आहे. यंदा विहिरी, कूपनलिका हिवाळ्यातच कोरड्या झाल्याने पाण्याचे मोठे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. अशा स्थितीत कूपनलिकेतून रोज मिळणाऱ्या फक्त आठशे लिटर पाण्याचा वापर फरताळे यांनी कुटुंबाची गरज भागवून नळसिंचनाद्वारे निंबोणी बागेला केला आहे. सायगाव-वाईबोथी रस्त्यावर फरताळवाडी येथे निंबोणीच्या प्रत्येक झाडाला नळ पाहून अनेक जण थबकतात. संदीप फरताळे मेकॅनिकल इंजिनिअर असून, कोपरगाव येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. मात्र संशोधन आणि शेतीची आवड यातून त्यांनी चार महिन्यांपूर्वी स्वतःच्या शेतीत दहा बाय दहा खड्डे खोदून त्यात काळी माती, शेणखत टाकून फुले, सरबती या वाणाच्या निंबोणीच्या २२० झाडांची लागवड पंधरा गुंठे क्षेत्रावर केली. रोज कूपनलिकेतून मिळणारे थोडे पाणी घराच्या छतावर असणाऱ्या टाकीत साठविले जाते. येथून एक इंची पाइपाद्वारे पाणी जवळच असणाऱ्या निंबोणीच्या बागेपर्यंत आणले जाते. येथून पुढे जमिनीलगत पाऊण इंच पाइपाचा वापर करून याला झाडाजवळ अर्धा इंच उभा पाइप जोडून त्याला नळ जोडला आहे. एकाच वेळी दहा झाडांना पाणी देता येईल, अशी व्यवस्था केली.

विशेष म्हणजे फक्त नळ काढून त्याला मिनी स्प्रिंकरल जोडण्याचीही सोय आहे. घरातील रोजचे शंभर लिटर सांडपाणी नैसर्गिकरीत्या शुद्धीकरण करून बागेला देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शेतात सर्व नळसिंचनाचे काम फरताळे यांनी पत्नी पूनमच्या मदतीने उभे केले असून, त्या रोज पाणी व्यवस्थापनाचे काम पाहतात. नोकरीच्या निमित्ताने फरताळे यांना अमेरिकेसह इतर देशांत जाण्याची संधी मिळाली. मात्र, जेथे खेळलो, बागडलो त्या मातीशी नाळ तुटू द्यायची नाही, या भावनेतून त्यांनी आपल्याच गावात, शेतात राहणे पसंत केले आहे.

झाडांना वीज नसतानाही कमी वेळेत जास्त दाबाने पाणीपुरवठा करता येतो. गरजेनुसार नळ चालू-बंद करता येतो. कमी आकाराच्या पाइपामुळे कमी पाण्याचा प्रभावी वापर होतो. अस्वच्छ पाण्यामुळे नळ बंद पडत नाही, हाताळण्यात अत्यंत सुलभ असून, शेतात जोडणी केल्यानंतर अनेक वर्षे तो बदलण्याची गरज पडत नाही. कमी पाण्यात नळसिंचन तंत्रज्ञान विशेषतः फळबागासाठी उपयुक्त ठरेल.
- प्रा. संदीप फरताळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Less water irrigation technology by Professor