शहरातील ९० टक्‍के परिसराला भारनियमनाचा झटका!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 मार्च 2017

जळगाव - उन्हाची तिव्रता वाढत असताना विजेची मागणी देखील वाढली आहे. यामुळे विद्युतप्रणालीवर अतिभार येत असल्याने ‘महावितरण’कडून आपत्कालिन भारनियमन सुरू केल्याने ग्राहकांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. भारनियमनाचा हा झटका शहरातील ९० टक्‍के परिसरातील नागरिकांना बसणार असून, केवळ दोनच फिडर सुटले आहेत.

जळगाव - उन्हाची तिव्रता वाढत असताना विजेची मागणी देखील वाढली आहे. यामुळे विद्युतप्रणालीवर अतिभार येत असल्याने ‘महावितरण’कडून आपत्कालिन भारनियमन सुरू केल्याने ग्राहकांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. भारनियमनाचा हा झटका शहरातील ९० टक्‍के परिसरातील नागरिकांना बसणार असून, केवळ दोनच फिडर सुटले आहेत.

जळगावात ‘मे हिट’चा तडाखा आतापासून जाणवू लागला आहे. गेल्या तीन दिवसांपासून तापमान ४४ अंशाच्याजवळ असल्याने उष्णतेची लाट पसरली आहे. यामुळे दोन दिवसांपासून कुलर, ए. सी. च्या वापरात वाढ होवू लागली आहे. परिणामी विजेच्या मागणीत वाढ होत असल्याने विद्युत प्रणालीवर अतिरिक्‍त भार पडू लागला आहे. भार वाढल्याने भारव्यवaस्थापन कक्ष कळवा (नाशिक) यांच्या निर्देशानुसार आपत्कालिन भारनियमन करण्यात आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार बुधवारपासून (ता. २९) आपत्कालिन भारनियमनाला सुरवात झाली असल्याने, उन्हाच्या झळा आणि उकाड्यामुळे नागरिक त्रासले आहेत.

पावणे पाच ते सव्वानऊ तासाचे भारनियमन

आपत्कालिन भारनियमन केले जात असले, तरी होणारे भारनियमन हे फिडरनिहाय आहे. भारनियमन हे ४ तास ४५ मिनिटांपासून ९ तास १५ मिनिट अशा प्रकारे होणार आहे. वितरण व वाणिज्यिक हानीच्या प्रमाणानुसार ‘ए’ ते ‘जी ३’ या गटांमध्ये फिडरची विभागणी करण्यात आली आहे. त्यानुसार ‘ए’ आणि ‘बी’ फिडर भारनियमनातून मुक्‍त ठेवण्यात आले आहे. यात ‘सी’ फिडरवर ४ तास ४५ मिनिट, ‘डी’-५ तास ३० मिनिट, ‘इ’- ६ तास १५ मिनिट, ‘एफ’-७ तास, ‘जी १’- ७ तास ४५ मिनिट, ‘जी२’-८ तास ३० मिनिट आणि ‘जी३’-९ तास १५ मिनिट याप्रमाणे भारनियमन निश्‍चित केले आहे.

मुक्‍ताईनगर, भोईटेनगर बारा तास पुरवठा खंडीत

जळगाव, ता. ३० ः उन्हाची तिव्रता वाढत असताना ‘महावितरण’कडून देखील आपत्कालिन भारनियमन सुरू करण्यात आले आहे. यात अनेकदा शहरातील विविध भागात विद्युत पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार देखील वाढले आहेत. याबाबत ‘महावितरण’कडे तक्रार करून देखील लागलीच समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. याचाच प्रत्यय शहरातील मुक्‍ताईनगर, भोईटेनगर परिसराती नागरीकांना आला. बुधवारी रात्रीपासून खंडीत झालेला विज पुरवठा गुरूवारी दुपारी दीडच्या सुमारास सुरळीत झाला होता. परिसरातील नागरीकांना बारा तास विद्युत प्रवाहाविनाच रहावे लागले.

शहरातील अनेक भागांमध्ये दुपारी, रात्रीच्यावेळी विजप्रवाह खंडीत होण्याचे प्रकारांमध्ये वाढ झाली आहे. यातच उन्हाची तिव्रता वाढल्याने नागरीक उकाड्याने हैराण होत आहेत. त्यानुसारच एसएमआयटी कॉलेज फिडरवरील विज प्रवाह खंडीत झाल्यानंत या भागातील नागरीकांना तब्बल बारा तास उकाड्यात रहावे लागले. एसएमआयटी फिडरमध्ये बिघाड झाल्याने बुधवारी (ता.२९) रात्री बाराच्या सुमारास खंडीत झालेला विज प्रवाह गुरूवारी (ता.३०) दुपारी दीडला सुरळीत झाला. यामुळे फिडरवरून लाईन जोडलेल्या निवृत्तीनगर, मुक्‍ताईनगर, हर्षवर्धन कॉलनी, बी.जे.नगर, एस.एम.आय.टी. कॉलेज परिसर, भोईटेनगर, वाघुळदेनगर, प्रेमनगर, बेंडाळेनगर या भागातील नागरीक हैराण झाले होते.

तीन फिडरांना मुक्‍ती
फिडरनिहाय भारनियमन करण्यात येत असून, यात ‘ए’ आणि ‘बी’ फिडर भारनियमनामुक्‍त करण्यात आले आहे. शहरात एकूण ३२ फिडर असून, यातील केवळ तीन फिडरवरून जोडण्यात आलेला परिसर भारनियमनापासून मुक्‍त आहे. यात ओंकारेश्‍वर मंदिर, प्रभात कॉलनी आणि भास्कर मार्केट या फिडरवरील परिसर सुटला आहे. याउलट सुप्रिम कॉलनी (जी ३) या एकमेव फिडरवर सर्वाधिक सव्वानऊ तासांचे भारनियमन होणार आहे. शहरातील एकूण फिडरपैकी ‘सी’ ग्रृपमध्ये ६, ‘डी’मध्ये ८, ‘ई’ मध्ये १, ‘एफ’मध्ये ४, ‘जी१’मध्ये ६ आणि ‘जी२’मध्ये ८ फिडर आहेत.

Web Title: Load Regulation attack

टॅग्स