जळगाव: दोन्ही लोकसभा मतदारसंघांत भाजप यश मिळविण्यास सक्षम

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 जानेवारी 2019

जळगाव - लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी कोणाला उमेदवारी द्यावी, हा प्रश्‍न त्यांचा आहे. भारतीय जनता पक्षाकडे दोन्ही लोकसभेसाठी भक्‍कम उमेदवार असून, आम्ही उमेदवारांच्या विजयासाठी सक्षम आहोत, असे मत जलसंपदामंत्री व भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी व्यक्त केले. पत्नी साधना महाजन या रावेर लोकसभेच्या उमेदवार नाहीत. त्याबाबत चर्चाही होऊ नये, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

जळगाव - लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी कोणाला उमेदवारी द्यावी, हा प्रश्‍न त्यांचा आहे. भारतीय जनता पक्षाकडे दोन्ही लोकसभेसाठी भक्‍कम उमेदवार असून, आम्ही उमेदवारांच्या विजयासाठी सक्षम आहोत, असे मत जलसंपदामंत्री व भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी व्यक्त केले. पत्नी साधना महाजन या रावेर लोकसभेच्या उमेदवार नाहीत. त्याबाबत चर्चाही होऊ नये, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

गिरीश महाजन दोन दिवसांपासून जामनेर दौऱ्यावर आहेत. त्यांच्याशी ‘सकाळ’ने संपर्क साधला. जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राज्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल यांना जळगाव लोकसभेची उमेदवारी देण्याची चर्चा सुरू आहे. याबाबत ते म्हणाले, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने कोणाला उमेदवारी द्यावयाची हा त्यांचा प्रश्‍न आहे. त्यांनी कोणालाही उमेदवारी दिली तरी भाजप दोन्ही मतदार संघात लढण्यास सक्षम आहे. आमची पूर्ण तयारी आहे. शिवाय आमच्याकडे दोन्ही मतदार संघात इच्छुकांची संख्या मोठी आहे. मात्र, उमेदवारीचा निर्णय पार्लमेंटरी बोर्डच घेईल.

साधना महाजन लोकसभा लढणार नाही
गिरीश महाजन यांच्या पत्नी व जामनेरच्या नगराध्यक्षा साधना महाजन रावेर लोकसभा मतदार संघातून उमेदवारी लढणार असल्याची चर्चा होती. याबाबत ते म्हणाले, साधना महाजन रावेर लोकसभा निवडणूक लढविणार नाहीत त्याबाबत चर्चाही होऊ नये. 

बारामती ‘पालिका’ जिंकून दाखविणार
जामनेर तालुक्‍यात एका कार्यक्रमात त्यांनी ‘बारामती’तही आपण जिंकू, असे वक्तव्य केले होते. याबाबत ते म्हणाले, आपण ‘बारामती’त लढणार असे आपण बोललो नाही, मात्र पालघर लोकसभा पोटनिवडणूक व चार महापालिकांप्रमाणेच बारामती पालिका निवडणुकीची जबाबदारी पक्षाने आपल्याकडे दिली तर त्या ठिकाणीही  नियोजन करून आपण विजय मिळवून दाखवू. आपण निवडणुकीचे ‘मायक्रो प्लॅनिंग’ करीत असतो. त्यामुळेच हे यश मिळते, असेही त्यांनी सांगितले.

‘युती’चा चेंडू सेनेच्या कोर्टात
भाजपला राज्यात युती हवीच आहे, असे मत व्यक्त करून श्री. महाजन म्हणाले, की राज्यात युती झाल्यास दोन्ही पक्षाला फायदा होणार आहे. त्यामुळे युती आवश्‍यक आहे, भाजपचे वरिष्ठ नेतेही त्यासाठी प्रयत्न करीत आहेत. आमची तयारीही आहे. आता चेंडू शिवसेनेच्या कोर्टात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Constituency BJP Success Girish Mahajan Politics