भाऊ, दादाचा नाद सोडा... करिअरकडे बघा!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मार्च 2019

नाशिक - लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून लोकशाहीचा सर्वांत मोठा उत्सव साजरा होतोय. त्यात आपसूक तरुणाईच्या जोडीला कार्यकर्त्यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग ठरलेला असतो. पण सध्याच्या मेगाभरतीच्या प्रक्रियेच्या पार्श्‍वभूमीवर प्रचारासाठी भाऊ, दादांच्या मागे फिरणे ही बाब करिअरच्या दृष्टीने महाग पडू शकते. विविध पदांच्या भरतीसाठी मुदतीत अर्ज न केल्यास चांगले करिअर घडण्यापासून मुकावे लागणार आहे, हे तरुणाईने ध्यानात घेणे, ही काळाची गरज बनली आहे.

सरकारतर्फे ७२ हजार पदांची मेगाभरती राबविण्याची घोषणा करण्यात आली. त्यानुसार विविध विभागांतर्गत रिक्‍त पदांच्या जाहिराती प्रसिद्ध होत असून, ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया राबवली जात आहे. काही पदांच्या परीक्षादेखील झालेल्या आहेत. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यापासून देशभरात निवडणुकांची चर्चा जोर धरू लागली आहे.

निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या उमेदवारांच्या प्रचाराची धुरा तरुण कार्यकर्त्यांवर राहणार आहे. पुढील काही दिवस तरुणाई घरोघरी जाऊन प्रचार करण्याप्रमाणेच सोशल मीडियातील प्रचारात दंग असेल. म्हणूनच अर्ज भरण्याच्या प्रक्रियेपासून होणाऱ्या परीक्षांच्या तयारीकडे तरुणाईने विशेष लक्ष देण्याची आवश्‍यकता आहे.

‘इकडे लक्ष असू द्या’
महसूल विभागांतर्गतच्या तलाठी पदाच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. राज्यात एक हजार ७७५ रिक्‍त पदे भरली जाणार असून, परीक्षेला प्रविष्ट होण्याची अंतिम मुदत शुक्रवारपर्यंत (ता. २२) आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना येत्या दोन दिवसांत अर्ज भरून अन्य बाबींची पूर्तता करणे आवश्‍यक असेल. पशुसंवर्धन विभागाच्या पशुधन पर्यवेक्षक पदाच्या १४९ जागा, तर परिचर पदाच्या राज्यातील ५८० जागांच्या भरतीसाठीदेखील ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी रविवारपर्यंत (ता. २४) अंतिम मुदत आहे. भारतीय रेल्वेत सुमारे १३ हजारांहून अधिक, तसेच अन्य विविध विभागांतही भरती राबवली जात असल्याने महत्त्वाच्या तारखांकडे युवकांचे लक्ष असणे आवश्‍यक आहे.

Web Title: Loksabha Electin Youth Carrier Government Mega Recruitment