voting
voting

लाखमोलाचे मताधिक्य देणाऱ्या तालुक्यांवर महाले-पवारांचे लक्ष!

येवला : मागील लोकसभा निवडणुकीत ज्या चांदवड,नांदगाव,येवला,निफाड विधानसभा मतदारसंघाने भारतीय जनता पक्षाला तब्बल लाखभर मते देऊन 50 हजारांच्या वर मताधिक्य दिले होते. या तालुक्यांसह जेथे आपल्या पक्षाची ताकद अधिक आहे तेथे अधिक प्रचार करण्यावर भाजपाचे उमेदवार भारती पवार व राष्ट्रवादीचे उमेदवार धनराज महाले यांनी लक्ष केंद्रीत केले आहे.मागील आकडेवारीनुसार उमेदवार व त्यांचे समर्थक मतांची जुळवाजुळव करण्यासाठी कोणत्या भागाला अधिक महत्त्व द्यायचे याचे नियोजन करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे दोघांनाही या बालेकिल्ल्यावर यावेळी विश्वास असल्याने आता मतदार कुणाचा विश्वास खरा ठरवितात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

निवडणूक दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची असली तरी त्यापेक्षा स्थानिक लोकप्रतिनिधींची आता खरी कसोटी लागली असल्याने भाजप-शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेसचे पदाधिकारी आपापल्या तालुक्यातून मताधिक्य देण्यासाठी कसोशीने कामाला लागले आहे. मागील वेळी मोदी लाट व सर्वपक्षीय सख्य असलेले हरिश्चंद्र चव्हाण उमेदवार असल्याने चांदवड,नांदगाव,येवला,निफाड मतदारसंघातून तब्बल लाखाचा मतांचा आकडा पार केला होता.यावेळी लाट नसली तरी 2014 ला पराभूत झालेल्या भारती पवार यांनी मात्र हे चार मतदारसंघ भाजपासाठी बालेकिल्ले असल्याचा विश्वास ठेवून चांदवड,नांदगाव,येवला,निफाडमध्ये प्रचारासाठी अधिक लक्ष केंद्रित केल्याचे दिसते. 

येवल्यात राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ असले तरी स्थानिक सर्वच सत्ता शिवसेनेकडे आहे. निफाडमध्ये आमदार अनिल कदम यांनी तर स्वतःची निवडणूक समजून जबाबदारी उचलली आहे. नांदगाव मध्येही सुहास कांदे व सहकारी नेटाने काम करत आहे. तिकडे कळवण स्वतःचा मतदारसंघ असल्याने येथील मताधिक्य त्यांनी गृहीतच धरले असल्याचे सांगण्यात येते.दिंडोरीत मात्र राष्ट्रवादीचे रामदास चारोस्कर आपल्या गोटात आल्याचा फायदा होऊन फिफ्टी-फिफ्टी मते मिळतील इथपर्यंत विश्वास पवारांच्या गोटात आहे. 

दुसरीकडे राष्ट्रवादी मात्र आजच विजय असल्याचे समजत आहे. येवल्यात भुजबळ यांची जादू चालून विधानसभे प्रमाणेच मताधिक्य मिळेल.निफाडमध्येही माजी आमदार दिलीप बनकर व सहकारी यावेळी शिवसेनेला मताधिक्य मिळू द्यायचे नाही या विचाराने जोमाने कामाला लागलेत. नांदगावमध्ये राष्ट्रवादीसह काँग्रेसचीही ताकद असून नाराज असलेल्या माजी आमदार अनिल आहेर यांची नाराजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी दूर केल्याने तेथेही आता नक्कीच मोठा फायदा होईल अशी अपेक्षा राष्ट्रवादीला आहे.कळवणमध्ये पवारांच्या घरातूनच त्यांना मते मिळणार नसल्याने नक्कीच तेथे आपण फिफ्टी-फिफ्टी राहू तर दिंडोरीत स्थानिक उमेदवार असल्याचा फायदा आपल्याला होऊन तेथे सर्वाधिक मताधिक्य मिळेल असाही कयास राष्ट्रवादीच्या गोटात आहे. 

जुने आकडे..नवा अंदाज!
२०१४ च्या निवडणुकीत चांदवड तालुक्याने भाजपाला विक्रमी ७४ हजार ७९६ मतांचे मताधिक्य दिले होते. यावेळी येथे तर आमदार राहुल आहेर असल्याने यात वाढ होते की शिरीष कोतवाल जोरात कामाला लागल्याने घट होते हे पहावे लागेल.त्यापाठोपाठ नांदगाव मतदार संघाने ६३ हजार २६५ तर निफाड मतदार संघाने ६१ हजारांचे मताधिक्य भाजपाला दिले होते. येवल्यात भुजबळ असतानाही ५३ हजार १३ मतांचे लीड तर दिंडोरीत २ हजार ९९७ मतांचे मताधिक्य मिळू शकले. याउलट स्वतःच्या कळवणमध्ये पवारांना अवघे ७ हजार ८८६ मताची आघाडीच मिळविणे त्यावेळी शक्य झाले होते.यावेळी हि आकडेवारी आपल्यासाठीच कायम राहील असा विश्वास महाले-पवार गोटात असल्याने याचे उतर आत्ताची राजकीय जुळवाजुळव व निकालानंतरच कळणार आहे.

२०१४ मध्ये विधानसभा मतदारसंघनिहाय मिळालेले मते..
मतदारसंघ    -भाजपा    -राष्ट्रवादी
चांदवड     - १,०८,३८१    -३३,५३२
येवला     - १,०२,९०२    -४९,८८९
नांदगाव     - १,००,०७२/    ३६,८०७
कळवण     - ५२,६२८    -६०,१५४
निफाड    - १,०१,६१८-    ४०,५४६
दिंडोरी     - ७६,७०४    -७३,७०७

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com