क्‍लोरोफॉम सुंगवून लाखाची रोकड लंपास!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जानेवारी 2017

जळगाव - शहरातील रामेश्‍वर कॉलनीतील तुलसीनगरातील रहिवासी तथा रेमंड कंपनीत कामाला असलेल्या सुदर्शन सुरेश चौधरी (वय 21) याची क्‍लोरोफॉम सुंगवून डिक्कीतील एक लाख सहा हजारांची रोकड लांबविल्याची तक्रार तरुणाने केली आहे. घरातील रक्कम कापूस जिनिंगमध्ये जमा करण्यासाठी घरून निघाल्यावर "डी-मार्ट'च्या दिशेने जाताना मेहरुण स्मशानभूमीजवळ दोघांनी वाहन अडवून रक्कम लुटून नेल्याची घटना तक्रारदार तरुणाने पोलिसांना सांगितली. त्यामुळे दुपारी दोनपासून एमआयडीसी पोलिस ठाण्याचे कर्मचारी, अधिकारी तपासासाठी धावपळ करीत होते.

सुदर्शन चौधरी एक लाख सहा हजार रुपये दुचाकीच्या डिक्कीत कापडी बॅगेत ठेवून मेहरुणकडून "डी-मार्ट'कडे जात होता. मेहरुण तलावालगतच्या शिवाजी उद्यानाजवळील स्मशानभूमीमार्गे जातानाच डिस्कव्हर दुचाकीवरील दोघांनी त्याला अडवून एकाने तोंडाला क्‍लोरोफॉमचा रुमाल सुंगवला, तर दुसऱ्याने दुचाकीच्या डिक्कीतील रक्कम काढली. त्यानंतर दोघांनी सुसाट पळ काढल्याचे सुदर्शनने पोलिसांना सांगितले. त्यानुसार त्याची तक्रार लिहून घेण्यात आली आहे.

घटनेचा तपास
सुदर्शनने लूटमार झाल्याचे सांगताच पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तत्काळ हालचाल करीत वाहनाद्वारे घटनास्थळ गाठत पाहणी केली. येणाऱ्या-जाणाऱ्यांना विचारपूस करून चौकशी केली. मात्र, भरदिवसा क्‍लोरोफॉम सुंगवून लुटीचा प्रकार घडण्यासारखी परिस्थितीच नसल्याने सायंकाळी हात हलवत परतलेल्या पोलिसांनी सुदर्शनचीच उलट तपासणी सुरू केली.

घटनाक्रम चक्रावणारा
सुदर्शन सकाळी घरातून काव्यरत्नावली चौकात गेला. तेथे ऍक्‍सिस बॅंकेतून वीस हजार रुपये काढून गिरणा पंपिंगजवळ जाऊन एकाला कामाचे दहा हजार रुपये दिले. नंतर तो स्वातंत्र्य चौकात पोहोचला. तेथे त्याने स्टेट बॅंकेत चोवीस हजार रुपये विड्रॉल स्लीप भरून पैसे मागितले असता बॅंक कर्मचाऱ्यांनी नकार दिला. तेथून तो घरी पोहोचला व घरी वेळोवेळी काढून ठेवलेल्या 96 हजार रुपयांची रोकड आणि जवळचे दहा हजार असे एकूण एक लाख सहा हजार रुपये घेऊन तो आव्हाणे (ता. जळगाव) येथील लक्ष्मी जिनिंगकडे निघाला होता. सुदर्शनच्या सांगण्यानुसार दुपारी साडेबाराला दुचाकीवरील दोघांनी त्याला थांबवून क्‍लोरोफॉम सुंगवत त्याच्या डिक्‍कीतील एक लाख सहा हजार रुपये पळवून नेले. या घटनाक्रमावर पोलिसांनाही संशय असून ही लूट आहे की लुटीचा बनाव या दिशेनेही पोलिस तपास करीत आहेत.

Web Title: loot in jalgav