Latest Marathi News | कापडणेतील शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान; महसूल विभागाचे पंचनाम्याकडे दुर्लक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवभाने शिवारात बापू माळी यांच्या शेवागा फळबागायत नुकसानीच्या पाहणी नंतर खलाणे दाम्पत्याची समस्या समजून घेताना जिल्हा परिषद सदस्य राम भदाणे, भटू पाटील, रवींद्र पाटील आदी.

कापडणेतील शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान; Revenue Departmentचे पंचनाम्याकडे दुर्लक्ष

कापडणे : मुसळधार पावसाने परिसरात बुधवारी (ता.२८) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास जनजीवन विस्कळित झाले. हा पाऊस ढगफुटी सदृश होता. शेती शिवारात बांध फुटले. नदी नाल्यांना पूर आले. मका बाजरी, कापूस, बोर आणि शेवगा बागायतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान झाले आहे.(Loss of lakhs to farmers due to heavy rain in kapadne dhule latest news)

महसूल विभागाने पंचनाम्याकडे दुर्लक्ष केले. काही बोर बागायतीचे पंचनामे केले. मका, बाजरी, ज्वारी यांच्या पंचनाम्यास नकार दिला. फळबागायतीचे पंचनाम्यांचे आदेश नाहीत. मात्र आम्ही आमच्या स्तरावर पंचनामे करुन घेत आहोत असे महसूल विभाग कर्मचाऱ्यांनी सांगितले.

शासन आणि प्रशासनाने पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत. झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होऊ लागली आहे. कापडणे शिवारातील आत्माराम पाटील यांचे बोरफळ बागायतीचे मोठे नुकसान झाले आहे. युवा शेतकरी राजा पाटील यांच्या मक्याचे सुमारे पाच लाखाचे नुकसान झाले आहे.

अद्यापही पंचनामा करण्यास महसूल विभाग आलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. देवभाने शिवारातील बापू माळी यांच्या शेतातील शेवगा फळबागायतीचे मोठे नुकसान झाले. बोर आणि शेवगाची झाडे मोडली. येथील शेतकऱ्यांच्या मक्याचे आणि कापसाचे नुकसान झाले आहे. हाता तोंडाशी आलेला घास हिसकावला गेल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

हेही वाचा: Traffic Crisis : वाहनाचालकांना पट्ट्याचा अन् पोलिसांना ‘ठोस’ कारवाईचा विसर

माझ्या मक्याचे दहा एकरपेक्षा अधिक आहे. यातून दोनशे क्विंटल पेक्षा अधिक मकाचे उत्पादन अपेक्षित होते. सुमारे पाच लाखाची कमाई मातीमोल झाली आहे.

-राजा पाटील, युवा शेतकरी कापडणे

मी सर्वसामान्य शेतकरी आहे. शेवगा फळ बागायत करून व स्वतः विक्री करून उदरनिर्वाह चालवत होतो. या पावसाने बागायतीचे मोठे नुकसान केले आहे.

-बापू माळी, देवभाने शिवार

या पावसाने शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. सरकारने सरसकट पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत. प्रति एकर पंचवीस हजाराची मदत द्यावी. तरच शेतकरी जगेल.

-आत्माराम पाटील, माजी जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटना

सरसकट पंचनाम्यासाठी पाठपुरावा सुरु आहे. शासनाने प्रती एकर नुकसान भरपाई द्यावी. यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शासन दुर्लक्ष करणार नाही. शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. विश्वास ठेवावा.

-राम भदाणे, जिल्हा परिषद सदस्य

हेही वाचा: Dhule News : बिजासनी घाटात अपघातात एक ठार