व्याहीची रंगली विहीनबाईसोबत प्रेमकथा

दीपक कच्छवा 
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

मुलांचा संसार सुखाने बहरत असताना, नातवंडे मांडीवर खेळविण्याच्या काळात परस्परांकडे निर्माण झालेल्या प्रेमळ ओढीने नात्याने व्याही व विहीन असलेल्या दोघांनी चक्क पलायन केले. मात्र, या दोघांना मेहुणबारे पोलिसांनी सुखरूप परत आणून नातेवाइकांकडे सोपवले. या घटनेतील व्याही नाशिक जिल्ह्यातील असून विहीनबाई चाळीसगाव तालुक्यातील आहे.

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : मुलांचा संसार सुखाने बहरत असताना, नातवंडे मांडीवर खेळविण्याच्या काळात परस्परांकडे निर्माण झालेल्या प्रेमळ ओढीने नात्याने व्याही व विहीन असलेल्या दोघांनी चक्क पलायन केले. मात्र, या दोघांना मेहुणबारे पोलिसांनी सुखरूप परत आणून नातेवाइकांकडे सोपवले. या घटनेतील व्याही नाशिक जिल्ह्यातील असून विहीनबाई चाळीसगाव तालुक्यातील आहे.

चाळीसगाव तालुक्यातील मुलगी नाशिक जिल्ह्यात दिलेली आहे. मुलीची आई ५ ऑगस्टला आपल्या मुलीला भेटायला नाशिक जिल्ह्यात गेलेली होती. मुलीकडे आई आल्यानंतर मुलीला आनंद झाला. त्या ठिकाणी मुलीचा सासरा व तिची आई यांची नकळत प्रेमकथा कधी सुरू झाली हे नातेवाईकांनाही समजले नाही. घरात कोणाच्याही मनाध्यानात नसताना ५२ वर्षीय व्याहीबुवा घरातून बाहेर गेले व थोड्या वेळाने ४५ वर्षीय विहीनबाई देखील गावी जाण्यासाठी निघाल्या. मात्र, या दोघांचे अगोदर ठरल्याप्रमाणे त्यांनी चक्क पलायन केले.

चाळीसगाव तालुक्यातून आपल्या मुलीला भेटायला नाशिक जिल्ह्यात गेलेली आपली पत्नी घरी परत न आल्याने विहिनबाईच्या नवऱ्याने पत्नीची शोधाशोध सुरू केली. आपली पत्नी कुठेही मिळत नसल्याने पतीने सोमवारी (१२ ऑगस्ट) मेहुणबारे पोलिस ठाणे गाठून पत्नी हरवल्याची तक्रार दिली. येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे यांनी या घटनेचा तपास सुरू करून महिलेचा शोध घेण्यासाठी एक पथक तयार केले.

या तपासात अखेर व्याहीबुवा दाभाडी (ता. मालेगाव, जि. नाशिक) येथे त्यांच्या विहीनबाईसोबत आल्याची गुप्त माहिती पोलिस हवालदार शैलेंद्र माळी यांना समजली. त्यानुसार, त्यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन बेंद्रे यांना कळविले. त्यांनी आपले कर्मचारी शैलेंद्र माळी, छबुलाल नागरे, गोरख चकोर, संजय पाटील व मिंलीद शिंदे यांना मालेगावला पाठवले.

पोलिसांनी प्रत्यक्ष दाभाडी गावच गाठले. पोलिस आल्याचा सुगावा व्याहीबुवांना लागताच त्यांनी बैलगाडीवर अंगावर कापडी फडके टाकून चोरून पोलिसांना पाहिले. बैलगाडीवर लपलेला व्याही पोलिसांना दिसताच त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तर दिले. मात्र, इच्छा नसतानाही व्याह्याला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर तो पोपटासारखा बोलू लागला. नाशिक येथे एका ठिकाणी आपण प्रेम करीत असलेल्या विहिनबाईला सुरक्षित ठेवल्याची कबुली त्याने दिली. त्यानंतर पोलिसांच्या सांगण्यावरून व्याहीने विहिणीला सायगावला बोलावले. अखेर दोघांचेही जबाब लिहून घेतल्यानंतर नातेवाइकांना बोलावून त्यांच्या स्वाधीन करण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Love story in jalgaon