Dhule Mahamarathon : मॅरेथॉन स्पर्धेचा मार्ग मोकळा; वाहनांसह पार्किंगसाठी सुविधा जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

dhule maharathon

Dhule Mahamarathon : मॅरेथॉन स्पर्धेचा मार्ग मोकळा; वाहनांसह पार्किंगसाठी सुविधा जाहीर

धुळे : शहरातील पोलिस परेड ग्राउंडपासून रविवारी (ता. ५) बिनचूकपणे सकाळी सहापासून जिल्हास्तरीय मॅरेथॉन (Marathon) स्पर्धा सुरू होणार आहे. स्पर्धा मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक रविवारी पोलिस अधीक्षक कार्यालयाकडील अधिसूचनेअन्वये पहाटे पाच ते सकाळी दहापर्यंत बंद करण्यात आलेली आहे. (maha marathon competition will start from Police Parade Ground in city without fail dhule news)

त्यामुळे स्पर्धा मार्गावर कोणीही आपली वाहने शनिवारी (ता. ४) रात्रीपासून रविवारी (ता. ५) सकाळी साडेदहापर्यंत लावू नयेत. तसेच स्पर्धा मार्गावरील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने सकाळी दहापर्यंत उघडावीत, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी केले. शहरात ३ किलोमीटर, ५ किलोमीटर, १० किलोमीटर, २१.१ किलोमीटर अशा विविध गटांत मॅरेथॉन स्पर्धा होत आहे.

ती ५ फेब्रुवारीला सकाळी सहाला पोलिस परेड ग्राउंड येथून सुरू होईल. तेथून बारापत्थर चौकमार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला वळसा घालून पुढे जुना आग्रा रोडवरून पाचकंदील, कराचीवाला खुंट, महात्मा गांधी पुतळा, मोठ्या पुलामार्गे दत्तमंदिर चौक, तेथून गोंदूर रोडमार्गे जिल्हा क्रीडासंकुल, गोंदूर गावालगत ८० स्पीडचा दिशादर्शक फलक इथपर्यंत व तेथून पुन्हा त्याच मार्गाने पोलिस ग्राउंडपर्यंत मॅरेथॉन स्पर्धा होईल.

वाहनांसाठी अशी सुविधा

स्पर्धेत विविध सामाजिक संस्था, विद्यार्थी, शासकीय अधिकारी व कर्मचारी, महिला, पुरुष व नागरिक मोठ्या संख्येने भाग घेणार आहेत. एसटी बस तसेच ट्रॅव्हल्स, लहान व मोठी वाहने यांनी बाह्य रस्त्याचा उपयोग करावा. एसटी बस स्टेशन रोडवरून संतोषीमाता चौक, जे. आर. सिटी हायस्कूलमार्गे बसस्थानकात ये-जा करतील.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

ज्या वाहनधारकांना नगावबारीकडून शहराच्या मध्यवर्ती भागात यायचे आहे त्यांना जुना आग्रा रोड ओलांडता येणार नसल्याने त्यांनी नगावबारी/नदीकाठावरील रोड/वरखेडी रोड/पारोळा रोड चौफुली किंवा चाळीसगाव चौफुली येथून ८० फुटी रोडने रेल्वे स्टेशन मार्ग, संतोषीमाता चौक या मार्गाचा वापर करावा.

--पार्किंगसाठी सुविधा

स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी आपली वाहने ऊर्दू हायस्कूल मनपा शाळा क्रमांक चार, बारापत्थर चौक, मनोहर चित्रमंदिर, नूतन पाडवी हायस्कूल, स्टेशन रोड, कनोसा हायस्कूल, जिल्हा न्यायालयाच्या बाजूला, स्टेशन रोड, जो. रा. सिटी. हायस्कूल, बसस्थानकामधील पार्किंग जागा, जिल्हा कारागृहासमोरील रोड (क्युमाइन क्लब) शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, जिल्हा न्यायालयातील पार्किंग ठिकाणी न्यावीत.

पार्किंग करताना स्वयंसेवक व पोलिसांना सहकार्य करावे, जेणेकरून स्पर्धा संपल्यानंतर कोणालाही वाहन काढताना अडथळा निर्माण होणार नाही. ‘फिट धुळे...हिट धुळे’ या घोषवाक्यांतर्गत आयोजित मॅरेथॉन स्पर्धेवेळी शहरातील सर्व नागरिक व वाहनधारकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही श्री. बारकुंड यांनी केले आहे.

टॅग्स :DhulepoliceMarathon