महालेंचे वर्चस्व जुने सिडकोपुरतेच मर्यादित 

विक्रांत मते - सकाळ वृत्तसेवा 
शनिवार, 4 मार्च 2017

नाशिक - महापालिकेच्या पहिल्या पंचवार्षिकपासून जुने सिडको भागातून सातत्याने निवडून येणाऱ्या महाले कुटुंबाने पारंपरिक जुन्या मतदारसंघाच्या पलीकडे जाऊन निवडणूक लढविण्याचा प्रयत्न केला; परंतु नवीन भागातील मतदारांनी त्यांना नाकारत जुने सिडकोपुरतेच मर्यादित ठेवल्याचे निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट झाले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना महाले यांचा मुलगा अमोल याला पराभवाचा सामना करावा लागला, तर पुतण्या राजेंद्र महाले यांना मतदारांनी स्वीकारले.

नाशिक - महापालिकेच्या पहिल्या पंचवार्षिकपासून जुने सिडको भागातून सातत्याने निवडून येणाऱ्या महाले कुटुंबाने पारंपरिक जुन्या मतदारसंघाच्या पलीकडे जाऊन निवडणूक लढविण्याचा प्रयत्न केला; परंतु नवीन भागातील मतदारांनी त्यांना नाकारत जुने सिडकोपुरतेच मर्यादित ठेवल्याचे निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट झाले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना महाले यांचा मुलगा अमोल याला पराभवाचा सामना करावा लागला, तर पुतण्या राजेंद्र महाले यांना मतदारांनी स्वीकारले. पारंपरिक मतदारसंघातून राजेंद्र निवडून आल्याने या भागावरचे महाले कुटुंबाचे सलग पंचवीस वर्षांपासून निर्विवाद वर्चस्व असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. 

जुने सिडको भागातील शिवाजी चौक, महाराणा प्रताप चौक, गणेश चौक, लेखानगर व काही प्रमाणात गोविंदनगरच्या भागावर महाले कुटुंबाला मतदारांनी कायम साथ दिली आहे. 1992 ते 2002 पर्यंत स्वतः नाना महाले त्यानंतरची दहा वर्षे राजेंद्र महाले येथून निवडून आले आहेत. कुठलीही लाट असली तरी त्या लाटेत महाले कुटुंबीयांची राजकारणातील नौका सहीसलामत बाहेर पडली आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजप, शिवसेनेच्या लाटेत निभाव लागेल की नाही याबाबत साशंकता होती. शिवाय कुटुंबातून एकापेक्षा अधिक इच्छुक तयार झाल्याने मुलगा की पुतण्याला उमेदवारी द्यावी याबाबत पेच निर्माण झाला होता. या दोन्ही कारणांमुळे पारंपरिक मतदारसंघाव्यतिरिक्त नवीन प्रभाग शोधण्याची वेळ आली. त्यातून पारंपरिक मतदारसंघातून राजेंद्र महाले व संभाजी स्टेडियम, मोरवाडी भागातून अमोल महाले राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तिकिटावर उभे राहिले. सोज्वळ स्वभाव, आतापर्यंत या भागात केलेली विकासकामे, मतदारांशी कायम ठेवलेला जनसंपर्क व नातेवाइकांचा गोतावळा या जोरावर राजेंद्र महाले यांना मतदारांनी कौल दिला. दुसरीकडे नवीन प्रभागातील मतदारांनी मात्र अमोल यांना नाकारल्याने महाले कुटुंबाच्या सत्तेच्या राजकारणातील मर्यादा स्पष्ट झाल्या. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून सत्तेच्या राजकारणात स्थिरस्थावर व्हायचे असेल, तर पारंपरिक मतदारसंघाव्यतिरिक्त मोठी झेप घ्यावी लागणार आहे. 

अर्चना टाकेकर यांचाही पराभव 
नवीन सिडकोत अस्तित्व निर्माण करतानाच द्वारका भागातील प्रभाग पंधरामधून नाना महाले यांची मुलगी अर्चना टाकेकर यांनी कॉंग्रेसकडून उमेदवारी केली. परंतु जनसंघ ते भाजपपर्यंतच्या प्रवासात येथील मतदारांनी प्रभागात कायम कमळ फुलविले. या परिस्थितीतही अर्चना यांनी कॉंग्रेसचे अस्तित्व टिकविण्याचा प्रयत्न केला; परंतु मतदारांनी पुन्हा एकदा भाजपला साथ देत अर्चना टाकेकर यांना नाकारले. भाजपची लाट, प्रभावी जनसंपर्काचा अभाव, हक्‍काच्या मुस्लिम मतदारांनी फिरविलेली पाठ ही पराभवाची प्रमुख कारणे ठरली.

Web Title: Mahale family nashik