सायबर गुन्हेगारांनी महाराष्ट्र बॅंक केली ‘कॅशलेस’!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

सहा ‘झिरो बॅलन्स’ खात्यांतून अर्धा कोटीची रक्कम परस्पर लंपास
जळगाव - बॅंक ऑफ महाराष्ट्रतर्फे मोबाईल बॅंकिंगसाठी मोबाईल ॲप खरेदी करून कार्यान्वित केलेल्या ‘यूपीआय ॲप’मध्ये (युनिफाइड पेमेंट इंटरफेस) तांत्रिक त्रुटींचा गैरफायदा घेत सायबर गुन्हेगारांनी शहरातील नवीपेठ शाखेतील सहा खात्यांमधून तब्बल ४९ लाख रुपये परस्पर काढून घेत बॅंकेला ‘चुना’ लावल्याचे उघडकीस आले आहे. शहर पोलिस ठाण्यात याप्रकरणी बुधवारी (ता. १२) मध्यरात्री सहा खातेदारांसह रक्कम काढून घेणाऱ्या सायबर लुटारूंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांच्या शोधार्थ पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत.

सहा ‘झिरो बॅलन्स’ खात्यांतून अर्धा कोटीची रक्कम परस्पर लंपास
जळगाव - बॅंक ऑफ महाराष्ट्रतर्फे मोबाईल बॅंकिंगसाठी मोबाईल ॲप खरेदी करून कार्यान्वित केलेल्या ‘यूपीआय ॲप’मध्ये (युनिफाइड पेमेंट इंटरफेस) तांत्रिक त्रुटींचा गैरफायदा घेत सायबर गुन्हेगारांनी शहरातील नवीपेठ शाखेतील सहा खात्यांमधून तब्बल ४९ लाख रुपये परस्पर काढून घेत बॅंकेला ‘चुना’ लावल्याचे उघडकीस आले आहे. शहर पोलिस ठाण्यात याप्रकरणी बुधवारी (ता. १२) मध्यरात्री सहा खातेदारांसह रक्कम काढून घेणाऱ्या सायबर लुटारूंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांच्या शोधार्थ पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत.

बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या येथील नवीपेठ शाखेच्या ‘पुल अकाउंट’मधून लाखो रुपयांची लूट करण्यासाठी संशयितांनी अगोदर महाराष्ट्र बॅंकेत ‘झिरो बॅलन्स’ची सहा खाती उघडली. त्या खात्यांचे पासबुक आधार लिंकिंग मोबाईल नंबर कार्यान्वित करून संबंधित मोबाईलच्या माध्यमातून तब्बल ४८ लाख ९४ हजार ४८२ रुपये परस्पर वळते करून घेण्यात आले. महाराष्ट्र बॅंकेतर्फे ‘कॅशलेस बॅंकिंग’साठी खरेदी करण्यात आलेल्या अधिकृत ‘यूपीआय ॲप’मध्ये मोबाईल क्रमांकाच्या माध्यमातून खात्यावर पैसे नसताना दिवसाला लाख रुपयांपर्यंत विड्रॉल होत असल्याची त्रुटी संशयितांनी हेरली.

या ॲप्लिकेशनच्या कमकुवत बाजूंची जाण असलेल्या जितेंद्र मारुती रिंधे याने खातेदारांना ‘झिरो बॅलेन्स’वर खाते उघडून, त्यातील प्रत्येक खात्यातून दिवसाला एक लाख याप्रमाणे २७ डिसेंबर ते १८ जानेवारीदरम्यान महाराष्ट्र बॅंकेच्या ‘पुल अकाउंट’मध्ये हात मारून जवळपास अर्धा कोटी रुपयांवर ‘डल्ला’ मारला.  

रक्कम परस्पर वळविणारे
जितेंद्र मारुती रिंधे, आताहमोहम्मद खान, राजेंद्र भानुदास बारडे, विजय वसंतराव मुरकुळे, गोपाळ गोविंदराव वानखेडे, सुनील केशवराव पंडागळे, राजेंद्र जनार्दन बडुरखेल.
 

‘पुल अकाउंट’ म्हणजे काय...?
बॅंकिंग व्यवहारात ‘व्हर्च्युअल अकाउंट’ आणि एक ‘पुल अकाउंट’ असे दोन प्रकार असतात. त्यात ‘व्हर्च्युअल’ प्रकारात रोज व्यक्तिश: खात्यांतून होणाऱ्या व्यवहारांचा समावेश असतो; तर ‘पुल अकाउंट’ हे एक प्रकारची ‘डिजिटल रक्कम’ असते. खात्यातून होणारे व्यवहार रोज टॅली होतात, म्हणून त्यात कमतरता नसल्याने व ज्या खात्यातून पैसे गेले, त्यातही डेबिट येत नसल्याने हा प्रकार लवकर लक्षात आला नाही.

बॅंकेचा आपल्या पातळीवर तपास
पैसे विड्रॉल झाल्यामुळे काही दिवसांपूर्वी बॅंक अधिकाऱ्यांच्या लक्षात ही बाब आली. सुरवातीला बॅंकेने आपल्या पातळीवर तपास सुरू केला. तपासाअंती त्यांना १३ जणांच्या खात्यांवर गैरप्रकारे पैसे जमा झाल्याचे, तसेच संबंधितांनी जमा झालेले पैसे खात्यातून काढून घेतल्याचे लक्षात आले. बुधवारी (ता. १२) बॅंकेच्या अधिकारी छाया गिरीश गरुडकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर तपास करीत आहेत.

रिंधेने भरवली ‘शाळा’
पोलिसांनी काही खातेदारांची चौकशी केली. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, रिंधे याने सर्वप्रथम सहा जणांना पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखविले होते. त्यानंतर त्याने सात-आठ जणांचे मोबाईल सिमकार्ड, पासबुकही स्वत:कडे ठेवले होते. ज्या खात्यातून ‘ॲप’द्वारे पैसे वळते करायचे आहेत, त्या खात्याचे लिंकिंग सिमकार्डदेखील रिंधेकडेच होते. परिणामी जितेंद्र रिंधे याने एका मोबाईलवरून मागणी करायची व दुसऱ्या मोबाईलच्या ॲप्लिकेशनद्वारे ‘येस’ म्हणत पैसे काढायचे, असा हा प्रकार आहे.

आरोपी खातेदार अन्‌ काढलेली रक्कम
सिराजुद्दीन शफीउद्दीन सय्यद (बाबा डेअरी, मेहरुण) - १० लाख ९४ हजार ४८२ रुपये
शेख सलीम शेख मुर्तूझा (प्लॉट क्रमांक ४, मेहरुण) - ४ लाख
शहेनाजबी जाकीर सय्यद (आव्हाणे, जि. जळगाव) - ८ लाख
मुन्तजीम सय्यद शफीउद्दीन सय्यद (मास्टर कॉलनी) - ७ लाख
शफियोद्दीन करिमोद्दीन सय्यद (संतोषीमातानगर, मेहरुण) - ३ लाख
 रफिक समशेरोद्दीन सय्यद (बाबा डेअरी, मेहरुण) - १६ लाख

ज्या खात्यातून पैसे काढण्यात आले, ते गोरगरीब लोक असून, त्यांना दर महिन्याला पैसे मिळणार असल्याचे प्रलोभन देत खात्याचा वापर केल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले आहे. संशयितांच्या शोधार्थ दोन पथके रवाना करण्यात आली आहेत. मुख्य संशयित पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे.
- प्रदीप ठाकूर, निरीक्षक, शहर पोलिस ठाणे

Web Title: maharashtra bank cashless by cyber criminals