महावितरणचा प्रामाणिकांना शॅाक; तर धनिकांवर फिदा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 फेब्रुवारी 2020

वीज वितरण कंपनीचे अधिकारी वीज मीटर बसवणाऱ्या ठेकेदारांना पाठीशी घालत आहे. वीज वितरणच्या भोंगळ कारभारामुळे त्रस्त नागरिकांच्या वतीने राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राउत यांच्याकडे शिवसेनेचे तालुका संघटक प्रा. धिरज पाटील यांनी तक्रार केली आहे.

भुसावळ : शहरातील जळगाव रोड भागातील ५ हजार ग्राहकांना वीज वितरणने एव्हरेज रिडींग पाठवले आहे. तर ५०० पेक्षा जास्त नागरिकांना दुसऱ्याच ग्राहकांच्या मीटरची देयके पाठवली जात आहे. देयक भरणा सूट असलेल्या तारखेच्या एक दिवस आधी वीज बिल नागरिकांना दिल्याने नियमित व वेळेवर बिल भरणाऱ्या ग्राहकांचे आर्थिक नुकसान होत आहे. 

नक्‍की पहा - भेटण्यासाठी आलेल्या पतीला पाण्यातून दिले विषारी औषध 

शहरातील श्रीनगर भागातील भरत लोखंडे यांना सलग आठ महिने एव्हरेज बिल दिले. नियमितपणे देयक अदा केले त्यांनी दर महिन्याला अर्ज सादर केला आणि अचानक या महिन्यात त्यांना १२ हजार ३२० रुपयांचे देयक आले. रवींद्र ओंकार सोनवणे यांना आठ महिन्याचे बिल सुधारणा केलीच नाही. लीलाधर आनंद पाटील यांना दर महिन्याला १३२ युनिटचे वाढीव बिल दिले जात आहे. भुसावळ हायस्कूल परिसरातील नीरज महेशदत्त तिवारी यांना अवाजवी बिल देऊन महिन्यातून दोन वेळेस महावितरणच्या कार्यालयाचा फेऱ्या कराव्या लागल्या. भोई नगर येथील सुरेश भोई यांना दुसऱ्याच ग्राहकाचे बिल दिले जात आहे. अयोध्या नगरातील साहेबराव माळी यांना तर बिले दिली गेली नाही. खैरनार वाडीतील सर्वच ग्राहकांना वाढीव बिले आहेत. अश्या असंख्य तक्रारी शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धिरज पाटील यांच्याकडे आलेल्या आहेत.

हेपण पहा - रक्षा खडसे आवडत्या खासदार : सुप्रिया सुळे

आरएफ मीटर निकामी
गेल्या आठ महिन्यांपासून हजारो ग्राहकांना अवाच्या सव्वा दराने वीज बिले येत आहेत. आरएफ मीटरचा संगणकीकरणाने काहीही फायदा झाला नाही. अजूनही मीटर रिडींग एजन्सीच रिडींग वाचन करीत असून, चुकीचे रिडींग देत आहे.
 
शहरात जुने वीज मीटर बदलण्यात आले; मात्र असंख्य ठिकाणी दबावापोटी अजूनही जुनेच मीटर कायम आहेत. नवीन आर एफ मीटर हे बोगस कंपन्यांचे असल्याचे समोर आले आहे. तपासणीसाठी पाठवण्यात येणारे फास्ट मीटरही नेहमीच योग्य असल्याचा अहवाल वीज मंडळाकडून दिला जातो. वीज वितरण कंपनीचे अधिकारी, वीज मीटर बसवणाऱ्या ठेकेदारांना दंड ठोकावा व काळ्या यादीत टाकावे, अन्यथा शिवसेनेतर्फे आंदोलन केले जाईल.
- प्रा. धीरज पाटील, तालुका संघटक, शिवसेना.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mahavitaran bhusawal news five thousand costmer average bill