ढील दे, दे दे रे भैया, इस पतंग को ढील दे !

संतोष विंचू -  सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जानेवारी 2017

खासियत निराळीच
बुरुड गल्लीत आसारी, पतंग व दोऱ्याची दुकाने सजली असून, खरेदीसाठी गर्दी होत आहे. स्थानिक कारागिरांच्या, तसेच सुरती व अहमदाबादी पतंगांना विशेष मागणी आहे. शहरात पतंग बनविणारे जवळपास पंधरा, विक्री करणारे २० ते २५, तसेच आसारी बनविणारे १० ते १५ कारागीर आहेत. प्रत्येक शौकीन किमान ५० ते २०० पतंग एकाच वेळी खरेदी करतात. अन्य साहित्य खरेदीचे प्रमाणही मोठे असते. यातून १५ ते १८ लाखांची उलाढाल होते, असे जाणकार सांगतात.

येवला - उत्सवप्रिय येवलेकरांनी पतंगोत्सवाची अफलातून परंपरा मागील वर्षापासून जपली आहे. जुनी पिढीच नाही तर नवी पिढीदेखील ही परंपरा दिमाखात अंगाखांद्यावर खेळवत आहे. यंदाही येवलेकर पतंगोत्सवासाठी सज्ज असून, या महाउत्सवासाठी पतंग, आसारी खरेदी अन्‌ मांजा बनविण्याची लगबग सुरू आहे. अहमदाबाद, सुरतपाठोपाठ येवल्यातही पतंगोत्सवाची धूम असते. म्हणूनच सुरतचे भावंडं म्हणून येवल्याची ओळख आहे.

येवलेकरांनी मकरसंक्रांतीच्या काळात तीन दिवस चालणाऱ्या पतंगोत्सवाची जोरदार तयारी केली आहे. यंदा आसारी वगळता भाववाढ झाली नाही. स्थानिक आसारी खरेदी करण्यासह पतंगासाठीचा मांजा सुतविण्याकरिता पतंगवेड्यांची चांगलीच लगबग आहे. भोगी, मकरसंक्रांत व कर या तीनही दिवशी सर्व येवलेकर तहानभूक विसरून पतंगोत्सवात भाग घेतात. परिसरातील अवघं आकाश अन्‌ ‘अरे दे ढील... ढील दे रे भैया’ अशी आरोळीवजा साद, प्रतिस्पर्ध्याचा पतंग काटल्यावर दुमदुमणारा ‘वक्काट’ हा कर्णकर्कश आवाज येथील पतंगोत्सवाची खासियत आहे. आजी-आजोबा, आई-वडील, मुलगा-सून अन्‌ नातूही अशा चार पिढ्यांच्या सदस्यांचा उत्स्फूर्त सहभाग नजरेत भरणारा असतो. जोडीला ‘डीजे’ची साद अन्‌ तरुणाईचा जल्लोष असतोच.

होममेड आसारी सर्वांची पसंत
येथे बनविली जाणारी आसारी पतंग उडविण्याचे मुख्य साधन आहे. बांबूच्या कामट्यांपासूनच येथील बुरुड गल्लीतील कारागीर या आसाऱ्या बनवितात. पन्नास वर्षांपासून आसारीचा व्यवसाय करणारे कारागीर येथे आहेत. खैरे, सोनवणे कुटुंबांतील १० ते १५ जण स्वतंत्र हा व्यवसाय करतात. चार पाती, सहा पाती, बारा पाती आदी प्रकारच्या आसाऱ्या कारागीर बनवितात. वैजापूर, नाशिक, सिन्नर व कोपरगाव आदी भागांतही येथील आसारी पोचते.

असे आहे साहित्याचे बाजारभाव
आसारी : लहान ः सहा पाती- ८० ते २०० रुपये, आठ पाती- २५० रुपये. मोठी ः आठ पाती- ३०० रुपये, बारा पाती- ४५० रुपये.   पतंग (डझन) ः पाऊणचा- ८४ ते १२०, सव्वाचा- २५० ते ३००, अर्धीचा- ४८ ते ५० रुपये, अर्धीचा (रंगीत)- ६० ते ६५ रुपये. दोरा ः एक ते चार हजार मीटर- ४० ते ४५०, कॉटन मांजा- ७० ते ९००, चरस- १५० रुपये किलो, तयार काच- ६० रुपये किलो.

Web Title: makar sankranti celebration