कर्जबाजारी शेतकऱ्याची देवघट येथे आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जानेवारी 2018

मालेगाव - विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे कर्ज, नापिकी, मुलीच्या विवाहाची चिंता व कपाशीवरील बोंडअळीचा प्रादुर्भाव यातून हतबल झाल्याने माळमाथ्यावरील देवघट (ता. मालेगाव) येथील किरण झिप्रू भामरे (वय ४५) यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला (गुरुवारी) रात्री विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. 

मालेगाव - विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे कर्ज, नापिकी, मुलीच्या विवाहाची चिंता व कपाशीवरील बोंडअळीचा प्रादुर्भाव यातून हतबल झाल्याने माळमाथ्यावरील देवघट (ता. मालेगाव) येथील किरण झिप्रू भामरे (वय ४५) यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला (गुरुवारी) रात्री विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. 

तालुक्‍यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. महिन्याच्या प्रारंभी डोंगराळे येथील धनश्री या शेतकरी तरुणीनेही आत्महत्या केली होती. भामरे यांच्याकडे अवघी सव्वा एकर जमीन होती. त्यांनी काबाडकष्ट करत कर्ज काढून मोठ्या मुलीचा विवाह करून दिला. मात्र, आणखी एका मुलीच्या विवाहाची त्यांना चिंता होती. यंदा त्यांनी कपाशी लावली, पण बोंडअळीने पिकाची वाट लावली. कांद्याचे क्षेत्र कमी होते. हक्काचे पीक गेले. त्यातच त्यांच्यावर विकास संस्थेचे व्याजासह ४३ हजार रुपये, तसेच बॅंक व अन्य हातउसनवारीचे मिळून दोन ते अडीच लाखांचे कर्ज असल्याचा अंदाज आहे. गुरुवारी (ता. २५) दुपारपासूनच ते बेपत्ता होते. तत्पूर्वी, तीन दिवसांपासून ते चिंताक्रांत व शांत होते. फारसे कोणाशी बोलतही नव्हते. गुरुवारी रात्री त्यांनी स्वत:च बांधलेल्या व मोठे कठडे असलेल्या गोरख निकम यांच्या विहिरीबाहेर चपला, चष्मा काढून ठेवत विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. कुटुंबीय त्यांचा शोध घेत असताना, दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना ही माहिती मिळाली. याबाबत तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. शेतकरी आत्महत्येचे वृत्त समजताच शनिवारी (ता. २७) तहसीलदार ज्योती देवरे, तालुका कृषी अधिकारी गोकुळ अहिरे, तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सतीश गावित यांनी देवघट येथे भेट देत भामरे कुटुंबीयांचे सांत्वन केले. शासनाला तातडीने संयुक्त अहवाल पाठवू, असे तहसीलदार श्रीमती देवरे यांनी सांगितले.

Web Title: malegaon news farmer suicide