मायलेकींना चौघा तरुणांच्या धाडसामुळे जीवदान

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जून 2018

गिसाका - अत्यंत गरीब परिस्थिती, दोन चिमुकल्या मुली, सासर-माहेर एकाच गावात, त्यात पतीच्या जाचाला कंटाळलेल्या महिलेने आपल्या दोन्ही चिमुकल्या मुलींसह गावातील सार्वजनिक विहिरीत उडी घेतली. मातेने फोडलेला टाहो ग्रामस्थांना आर्त हाक देऊन गेला आणि तत्काळ चौघा युवकांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता विहिरीत उडी घेत मातेसह तिघांचे प्राण वाचविले. 

गिसाका - अत्यंत गरीब परिस्थिती, दोन चिमुकल्या मुली, सासर-माहेर एकाच गावात, त्यात पतीच्या जाचाला कंटाळलेल्या महिलेने आपल्या दोन्ही चिमुकल्या मुलींसह गावातील सार्वजनिक विहिरीत उडी घेतली. मातेने फोडलेला टाहो ग्रामस्थांना आर्त हाक देऊन गेला आणि तत्काळ चौघा युवकांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता विहिरीत उडी घेत मातेसह तिघांचे प्राण वाचविले. 

मालेगाव तालुक्‍यातील गुगुळवाड गावात ग्रामपंचायत इमारतीजवळ सार्वजनिक विहीर आहे. विहीर पन्नास फूट खोल आणि तिच्यात सध्या वीस फुटांपर्यंत पाणी आहे. ग्रामपंचायत कामाच्या चौकशीसाठी गावातील दोन्ही गटांचे लोक जमलेले असताना येथील फमाबाई पोपट धायतोंडे (वय २५) या महिलेने आपल्या दीड वर्षाच्या व तीन महिने वयाच्या दोन्ही मुलींसह या विहिरीत उडी घेतली. ग्रामपंचायतीसमोरील गर्दीने तत्काळ विहिरीकडे धाव घेतली असता विहिरीत मोठी मुलगी गटांगळ्या खात होती, तर फमाबाई स्वत: बुडत होती. मात्र आपल्या तान्हुलीला वाचविण्याच्या प्रयत्नात पाइपाचा सहारा घेतला. एका हातात मुलगी, एक हात पाइपाला धरलेला अन्‌ मोठ्या मुलीचा जीव वाचावा म्हणून मातेचा टाहो ऐकून सर्वच गर्भगळित झाले. परंतु तेथे आलेले नाना खोमणे, भय्या सोनवणे, समाधान खोमणे, भाऊसाहेब खोमणे या चार तरुणांनी विहिरीत तत्काळ उडी घेत तिघींचे प्राण वाचविले. 

नाना खोमणेंनी पहिली उडी मारली अन्‌...
आम्ही ग्रामपंचायत गैरकारभाराच्या चौकशीचा तक्रारअर्ज दिलेला होता. या चौकशीसाठी पंचायत समिती अधिकाऱ्यांचे पथक ग्रामपंचायतीत आले होते. त्यामुळे दोन्ही गटांचे लोक, तरुण ग्रामपंचायतीच्या इमारतीखाली उभे होते. तेवढ्यात आमच्या कार्यकर्त्याच्या सुनेने दोन लहान बाळांना घेऊन विहिरीत उडी मारली. त्यात चार महिन्यांचे बाळ व चार वर्षांची मुलगी होती. आरडाओरडा होताच काही सेकंदात आम्ही विहिरीच्या कठड्यावर आलो. नाना खोमणे याने पहिली उडी मारली. परकर फुग्यासारखा झाल्याने ती मायमाउली पाण्यावर हातपाय मारत होती. चार महिन्यांचे बाळ तिने छातीशी धरले होते, तर चार वर्षांची मुलगी पाण्यात गटांगळ्या खात होती. सर्व गाव जमले. पटापट दोर, बादल्या टाकल्या. पाच-सात जणांनी विहिरीत उड्या मारल्या. दोन्ही बाळांना बादलीतून व त्या आईला दोर बांधून वर काढले. मंगळवारी (ता. १२) चौकशीसाठी गर्दी नसती तर हे तीन जीव वाचले नसते. मृत्यूच्या दाढेतून परत येऊन ती दोन्ही बालके दिलखुलासपणे हसत होती. काय घडले, याची त्यांना काहीही कल्पना नव्हती. विहिरीत बुडत असताना ती मायमाउली स्वतः गटांगळ्या खात बाळाच्या तोंडात पाणी जाऊ देत नव्हती. आई काय असते, ते आज मला ‘याचि देही याचि डोळा’ बघायला मिळाले. त्या पंधरा मिनिटांच्या चित्तथरारक दृश्‍याने जमलेल्या शेकडो आबालवृद्धांचे श्‍वास थांबले होते, अशी बोलकी प्रतिक्रिया राजेंद्र निकम यांनी दिली.

Web Title: malegaon news Life for the mother and daughter