esakal | मालेगाव: अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा बेतला रोहींच्या जिवावर
sakal

बोलून बातमी शोधा

rohi

मालेगाव: अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा बेतला रोहींच्या जिवावर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मालेगाव: सुकांडा शेत शिवारातील विजेच्या मुख्य प्रवाहाचे दोन खांब खाली झुकलेले असून, ताराही लोंबकळाल्या आहेत. यामुळे गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता असून या कामाची तत्काळ दुरुस्ती करण्याबाबतचे लेखी पत्र वीज कंपनीच्या सुकांडा येथील स्थानिक वायरमनने नोव्हेंबर २०२० मध्येंच वीज वितरण कंपनीच्या मेडशी येथील कनिष्ठ अभियंत्यासह मालेगाव येथील अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यांना पत्र दिले होते.

हेही वाचा: नाशिक शहरातील 2 हजार विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर

तब्बल वर्षभराच्या कालावधीतही या कामाची दुरुस्ती केली नसल्यानेच गत महिन्यात १६ ऑगस्ट रोजी सुकांडा शेत शिवारात चार निष्पाप रोहींचा विजेच्या धक्क्याने जीव गेल्याची घटना घडली होती. रोहींच्या मृत्यूला वीज कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची कर्तव्यातील कसूर व हलगर्जीपणाच कारणीभूत असल्याची बाब आता उघड होत असून, या प्रकरणी मालेगाव वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी ता.१ सप्टेंबर रोजी मालेगाव वीज वितरण कंपनीच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यांना चौकशीसाठी बोलावून त्यांचे बयान नोंदविल्याने आता या प्रकरणात आणखी काही अधिकाऱ्यांवर वनविभागाकडून गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने वीज वितरण विभागात एकच खळबळ उडाल्याचे दिसत आहे.

मालेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या सुकांडा शेत शिवारातील एका शेतामध्ये मुख्य वीज वाहिनीच्या लोंबकळलेल्या तारांमधील विजेच्या प्रवाहाच्या धक्क्याने चार रोहींचा मृत्यू झाल्याची घटना १६ ऑगस्ट रोजी सकाळच्या दरम्यान उघडकीस आली होती. याची माहिती वनविभागाला मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सुकांडा येथील वायरमन यांच्यासह मेडशी वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता देसले यांच्या विरोधात भारतीय वन्यजीव अधिनियम १९७२ चे कलम २ (१६) २ (३५), ९, ३९ (३) क ५१ गुन्हा दाखल केला आहे.

मात्र, स्थानिक वायरमनने विजेचे झुकलेले खांब व लोंबकळलेल्या तारामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे लेखी पत्र वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना गत वर्षापूर्वीच दिले असल्याचे सांगण्यात आले आहे.

loading image
go to top