मनमाड बालसुधारगृहातील  मुलावर लैंगिक अत्याचार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 जुलै 2017

मनमाड - येथील बालसुधारगृहात सातवर्षीय मुलावर काळजीवाहू कर्मचारी संजय पोटिंदे याने अनैसर्गिक कृत्य करत अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी ‘पोक्‍सो’सह लैंगिक अत्याचाराच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करत संशयित आरोपीला अटक केली. या घटनेमुळे नागरिक संतप्त झाले असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाईची मागणी केली आहे. 

मनमाड - येथील बालसुधारगृहात सातवर्षीय मुलावर काळजीवाहू कर्मचारी संजय पोटिंदे याने अनैसर्गिक कृत्य करत अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी ‘पोक्‍सो’सह लैंगिक अत्याचाराच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करत संशयित आरोपीला अटक केली. या घटनेमुळे नागरिक संतप्त झाले असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाईची मागणी केली आहे. 

मनमाडला १९४९ मध्ये बालसुधारगृह म्हणजे रिमांडहोम सुरू करण्यात आले. बालगुन्हेगार, घरातून पळून आलेले, चुकलेले, हरवलेले, सापडलेल्या मुलांना बालकल्याण समितीमार्फत त्यांना त्यांच्या घरी पोचविण्यासाठी, त्यांच्या वर्तनात सुधारणा व्हावी यासाठी बालसुधारगृहात पाठविले जाते. मात्र, या बालसुधारगृहातच एका मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सातवर्षीय मुलगा बालसुधारगृहात असताना तेथेच काम करणारा काळजीवाहू कर्मचारी संजय विठ्ठल पोटिंदे (रा. मुरलीधरनगर, मनमाड) हा या मुलाला सतत त्रास देत होता. पोटिंदेने त्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार केले. झालेला प्रकार कोणाला सांगू नये, यासाठी त्याला धाक दाखविला जायचा. त्यामुळे हा मुलगा भीतीपोटी व दडपणाखाली होता. पण अत्याचाराचा त्रास वाढतच गेल्याने त्याने परवा रात्री पुन्हा असा प्रकार घडल्यानंतर सकाळी कामावर आलेल्या दुसऱ्या काळजीवाहू कर्मचाऱ्याला हा प्रकार सांगितला. या कर्मचाऱ्याने त्याच्या वरिष्ठांना हा प्रकार सांगितला. त्यांनी महिला व बालकल्याण समितीच्या अधिकारी पाटील यांना याची माहिती दिली. घडलेला प्रकार गंभीर असल्याने श्रीमती पाटील यांनी मंगळवार (ता. ४) येथे भेट देऊन या प्रकरणाची सखोल चौकशी केली. त्या मुलाची वैद्यकीय तपासणी केली असता, लैंगिक अत्याचार झाल्याचे संकेत मिळताच त्यांच्या उपस्थितीतच बालसुधारगृहाचे लिपिक मिखिल लक्ष्मीकांत स्वर्ग (वय ३८) यांनी याप्रकरणी मनमाड पोलिसांत फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी संशयित संजय पोटिंदे याला तत्काळ अटक केली. त्याच्यावर बाललैंगिक अत्याचारासंदर्भात असलेल्या ‘पोक्‍सो’सह लैंगिक अत्याचारासंदर्भातील विविध कलमांनव्ये गुन्हा दाखल केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक डॉ. राहुल खाडे, पोलिस निरीक्षक पुंडलिक सपकाळे यांनी बालसुधारगृहाला भेट देऊन पाहणी केली. याचा तपास उपनिरीक्षक छाया पाटील करीत आहेत. 

पीडित रेल्वेस्थानकावर सापडलेला
अत्याचाराचा बळी ठरलेला हा सातवर्षीय मुलगा हरवलेल्या अवस्थेत रेल्वे पोलिसांना सापडला होता. त्यानंतर पोलिसांनी महिला व बालकल्याण समितीमार्फत त्याची बालसुधारगृहात रवानगी केली होती. मनमाडच्या बालसुधारगृहात १८ बालके आहेत. या सुधारगृहात मुलावर लैंगिक अत्याचार होऊनही बालसुधारगृहाचे विश्‍वस्त गप्प का? असा सवाल उपस्थित होत आहे. 

‘सुधार’गृह की ‘अत्याचार’गृह? 
बालसुधारगृहातील मुलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्‍न या घटनेमुळे निर्माण झाला आहे. लैंगिक अत्याचाराचा हा प्रकार नेमका कधीपासून सुरू आहे? यात इतर काही मुलांवरही अत्याचार झाले आहेत का? हा सर्व प्रकार घडत असताना प्रशासनासह विश्‍वस्त काय करत होते, असे अनेक प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. झालेल्या प्रकारामुळे बालसुधारगृहातील इतर मुलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ते भेदरले असून, त्यांच्या सुरक्षेसंदर्भात प्रश्‍न निर्माण झाला आहे. याच बालसुधारगृहाच्या प्रभारी अधीक्षकांना काही दिवसांपूर्वी लाच घेताना मुद्देमालासह पकडले होते. 

Web Title: manmad news Sexual Abuse on the Child