प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या भाषांतराचे धिंडवडे

kp.jpg
kp.jpg

नांदुरा : देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी, या हेतूने केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंमलात आणली आहे. त्या अंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये तीन हप्त्यात दिले जात आहे. त्यासाठी पोर्टलवर तशी शेतकऱ्यांची नोंद त्या-त्या तहसील अंतर्गत महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे. ती नावे व माहिती इंग्रजीत करण्यासाठी तहसील कार्यालयाने भाड्याने ऑपरेटर ठेवले होते. तेव्हा त्यांनी मराठीचे इंग्रजी करण्यासाठी गुगल ट्रान्सलेटचा वापर केल्याने इथेच शेतकऱ्यांच्या नावात मोठा घोळ झाला आहे.

दरम्यान, नांदुरा तालुक्यातील फुली येथील काही शेतकऱ्यांचे समाधानचे ‘सॅटीसफेक्शन’, दिपकचे ‘लाइट’, वाघ आडनावाचे ‘टायगर’, सातवचे ‘सेवन्थ’ करत या विभागाने अकलेचे तारे तोडत शेतकऱ्यांचे नाव व आडनावच बदलले. हा नावांचा घोळ एका गावापूरता नसून असे अनेक गावांत असे झाल्याने व नावे जुळत नसल्याने अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित ठरत आहेत.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्यापूर्वी शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठी त्या-त्या तालुक्यातील तलाठी, कृषी साहाय्यक व ग्रामसेवक यांनी तशी माहिती तहसील कार्यालयाला मराठीत सादर केली होती. परंतू प्रधानमंत्री किसान संकेतस्थळालातील इंग्रजीत सादर करावयाची असल्याने तहसीलने भाडोत्री ऑपरेटर बसवून त्यांनी मराठीतील नावे व माहिती इंग्रजीत करण्यासाठी गुगल ट्रान्सलेटचा वापर केला असल्याने हा सर्व घोळ झाला आहे. त्यातून नावाचे मजेदार किस्से हे संकेतस्थळ उघडल्याने बाहेर पडले आहेत.

नांदुरा तालुक्यातील एकट्या फुली येथील प्रधानमंत्री किसान पोर्टलवर सुभाष प्रल्हाद वाघ यांचे सुभाष प्रल्हाद ‘टायगर’, दीपक यादव इंगळे यांचे ‘लाइट’ यादव इंगळे, जगन्नाथ समाधान बोदडे यांचे जगन्नाथ ‘सॅटिसफेक्शन’ बोदडे, गजानन पांडुरंग सातवचे गजानन पांडुरंग ‘सेवन्थ’ असे दिसून येत असल्याने अशा या चुकांमुळे हे लाभार्थी नाव जुळत नसल्याने या योजनेपासून वंचित राहिले आहेत. हे नमुना दाखल असले तरी अनेक गावांत हाच नावाचा घोळ झाल्याने शेतकऱ्यांचे हक्काचे पैसे त्यांच्यापर्यंत पोहचू शकले नाहीत. यासाठी आतातरी प्रशासनाने चूक दुरुस्त करून हा निधी त्यांचेपर्यंत पोहचावा अशी मागणी सर्व शेतकरी वर्गाकडून होत आहे. याबाबत तहसीलदार नांदुरा यांचेशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही.

* आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांचे ‘सॅटिस्फॅक्शन’ ऐवजी समाधान होणे गरजेचे
यावर्षी पीक काढणीच्या वेळेस पावसाने थैमान घातल्याने शेतकऱ्यांच्या पिकाचे होत्याचे नव्हते झाल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. नुकसानीची कोणतीही मदत मिळत नसल्याने किसान सन्मान निधी मिळेल व आधार होईल ही अपेक्षा असतांनाच नावातील घोळामुळे हक्काचा निधी अडकला गेला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com