मराठा मोर्चे दलितविरोधात नाहीत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 सप्टेंबर 2016

जळगाव - राज्यात मराठा समाजाचे निघत असलेले मोर्चे हे दलित समाजाच्या विरोधात नाहीत; तर प्रस्थापितांच्या विरोधात असलेला हा समाजाचा रोष आहे, असे मत मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

जळगाव - राज्यात मराठा समाजाचे निघत असलेले मोर्चे हे दलित समाजाच्या विरोधात नाहीत; तर प्रस्थापितांच्या विरोधात असलेला हा समाजाचा रोष आहे, असे मत मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

जळगाव येथे पद्मालय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, की मराठा समाजाने राखीव जागांची केली मागणी न्याय आहे. मराठा समाजाची आरक्षणाची मागणी केल्या 34 वर्षांपासून आहे. हा प्रश्‍न उगाच रेंगाळत ठेवण्यात आला. त्यामुळे आजच्या स्थितीत समाजातील व्यक्ती आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाला. तो व्यक्ती आज मोर्चाच्या माध्यमातून रोष व्यक्त करीत आहे. समाजाला राखीव जागा देण्यास आपला पाठिंबा आहे. परंतु सद्यःस्थितीत असलेल्या राखीव जागांना धक्‍का न लावता कायद्याच्या चौकटीत राहून त्या देण्यात याव्यात. त्यासाठी घटनादुरुस्तीसही आपला पाठिंबा आहे. मात्र हे मोर्चे दलित विरोधी आहेत, असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहेत. दलितांना विरोध असण्याचे कोणतेही कारण नाही. उलट असा मुद्दा पुढे आणून जातीय तेढ निर्माण करण्याचा काहीजण प्रयत्न करीत आहेत. तो हाणून पाडला पाहिजे.

ऍट्रॉसिटी रद्द करू नये
ऍट्रॉसिटी कायदा रद्द करण्याच्या मागणीबाबत ते म्हणाले, हा कायदा रद्द करण्याची मागणी चुकीचीच आहे. विशेष म्हणजे या कायद्याची अंमलबजावणी होते काय, हाच महत्त्वाचा मुद्दा आहे. या कायद्यान्वये दाखल झालेले गुन्हे आणि शिक्षेची संख्या लक्षात घेता त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रातही प्रभावी होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे हा कायदा रद्द करावा ही मागणी चुकीची आहे, त्याला आमचा विरोध आहे. या कायद्याचा गैरवापर होत असल्याने त्यात बदल करावा, अशी मागणी पुढे आहे. मात्र, नेमका काय बदल करावा याबाबत माहिती ही मागणी करणाऱ्यांनी द्यावी. ज्या संसदेला हा अधिकार आहे, त्याठिकाणी हे मुद्दे उपस्थित करावे. त्या अनुषंगाने त्याबाबत चर्चा करून विचार करता येईल.

समता अभियानाची स्थापना
देशातील बदलत्या आर्थिक, सामाजिक, राजकीय, आणि सांस्कृतिक पार्श्‍वभूमीवर जनतेचे प्रश्‍न शासनाकडे मांडण्यासाठी पक्षविरहित समता अभियानाची स्थापना केली आहे. जात, धर्म, प्रदेशनिरपेक्ष असलेली ही संघटना आहे. त्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येईल. महाराष्ट्रातून हे अभियान सुरू झाले असून, देशपातळीवर त्यांचे कार्य करण्यात येईल. यावेळी मुकुंद सपकाळे, खलिल देशमुख (पाचोरा), विवेक ठाकरे, राजेश झाल्टे, समाधान सुरवाडे आदी उपस्थित होते.

Web Title: Maratha not against Dalit Front