बोगस वैद्यकीय व्यावसायिकांवर आता थेट कारवाई; पथक नेमले 

निखील सुर्यवंशी
Friday, 29 January 2021

बोगस वैद्यकीय व्यवसायिकांमुळे रुग्णांचा जीव धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांविरुध्द तातडीने कारवाई करावी. आवश्यक तेथे पोलीस दलाची मदत घ्यावी.

धुळे : जिल्ह्यात बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. कारवाई पथकांना पुरेसा पोलीस बंदोबस्त द्यावा. तसेच बोगस वैद्यकीय व्यवसाय प्रतिबंध समितीची बैठक नियमितपणे घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले. 

जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात गुरूवारी (ता. २८) दुपारी बोगस वैद्यकीय व्यवसाय प्रतिबंध समितीची बैठक झाली. जिल्हाधिकारी यादव अध्यक्षस्थानी होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मती सी., महापालिकेचे आयुक्त अजीज शेख, समिती सदस्य सचिव तथा पोलिस उपअधीक्षक प्रदीप पाडवी, जिल्हा सर्वोपचार रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. राजकुमार सूर्यवंशी, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. आर. व्ही. पाटील, महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश मोरे, अन्न व औषध प्रशासन विभागाचे साहाय्यक आयुक्त विजय बच्छाव, अशासकीय सदस्य डॉ. योगेश सूर्यवंशी, ॲङ चंद्रकांत येशीराव आदी उपस्थित होते. 
 
यादी प्रकाशीत करा 
जिल्हाधिकारी यादव म्हणाले, की बोगस वैद्यकीय व्यवसायिकांमुळे रुग्णांचा जीव धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांविरुध्द तातडीने कारवाई करावी. आवश्यक तेथे पोलीस दलाची मदत घ्यावी. संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करावे. यापूर्वी गुन्हा दाखल होवूनही पुन्हा बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांविरोधात शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कठोर कारवाई करावी. शिवाय अशा वैद्यकीय व्यावसायिकांची यादी प्रकाशित करावी. महापालिकेनेही आपल्या कार्यक्षेत्रातील अशा व्यावसायिकांवर कारवाई करावी. 
नागरिकांनी बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांविरोधात तक्रार नोंदवावी. या प्रकरणी कारवाईस टाळाटाळ करणाऱ्यांविरोधात शिस्तभंगाची कारवाई करावी, असेही निर्देश जिल्हाधिकारी यादव यांनी दिले. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi dhule news action now on bogus medical professionals