गोटे दोंडाईचात; रावलांचे शक्तिप्रदर्शन 

निखील सुर्यवंशी
Saturday, 19 December 2020

माजी आमदार गोटे यांनी ११ डिसेंबरला दुपारी सव्वातीनला टाकरखेडा येथे तापी नदीकाठी रावल परिवाराच्या खासगी तापी फार्महाउसमध्ये प्रवेश केला. त्याठिकाणी झालेले कथीथित अतिक्रमण पाहण्यासाठी गेल्याचा दावा श्री. गोटे यांनी केला.

दोंडाईचा (धुळे) : टाकरखेडा (ता. शिंदखेडा) येथील तापी फार्महाउसमधील प्रवेश प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार अनिल गोटे आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार जयकुमार रावल यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. या प्रकरणी श्री. गोटे यांच्याविरुद्ध दोंडाईचा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. नंतर ते स्वतः दोंडाईचा पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता. १८) हजर झाले, तर त्यांना विरोधासाठी रावल गटाने शक्तिप्रदर्शन केले. 
माजी आमदार गोटे यांनी ११ डिसेंबरला दुपारी सव्वातीनला टाकरखेडा येथे तापी नदीकाठी रावल परिवाराच्या खासगी तापी फार्महाउसमध्ये प्रवेश केला. त्याठिकाणी झालेले कथीथित अतिक्रमण पाहण्यासाठी गेल्याचा दावा श्री. गोटे यांनी केला. या प्रकरणी फार्महाउसचे व्यवस्थापक प्रतापसिंग गिरासे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, माजी आमदार गोटे यांच्याविरोधात दोंडाईचा पोलिस ठाण्यात कामगाराला धक्काबुक्की करणे, मोबाईल हिसकावून फेकणे, आमदार जयकुमार रावल यांना शिवीगाळ करणे आदी कारणांवरून गुन्हा दाखल झाला. 

परस्परांप्रति आव्हाने 
या पार्श्वभूमीवर माजी आमदार गोटे यांनी शुक्रवारी (ता. १८) दुपारी दोनला राष्ट्रवादी काँग्रेसच्या एक हजार कार्यकर्त्यांसह मिरवणुकीने दोंडाईचा पोलिस ठाण्यात हजर होईल, असे पत्रकाद्वारे जाहीर केले. त्यास प्रतिआव्हान देत रावल समर्थक भाजपचे जिल्हाध्यक्ष नारायण पाटील यांनी माजी आमदार गोटे यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी दोन हजार कार्यकर्ते घेऊन मोर्चा काढला जाईल, असे पत्रकाद्वारे जाहीर केले. या स्थितीमुळे दोंडाईचातील घडामोडींकडे लक्ष होते. 

गोटे पोलिस ठाण्यात हजर 
संसर्गजन्य कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव, जमावबंदी व प्रतिबंधात्मक आदेश लागू असणे, कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्‍न लक्षात घेता पोलिसांनी गोटे व रावल यांना शांतताकामी सहकार्य करावे, असे आवाहन केले. त्यानुसार श्री. गोटे यांनी दोंडाईचा पोलिस ठाण्यात एकटे जाणार असल्याचे जाहीर केले, तर रावल गटाने रावल गढीवर समर्थक दोन हजार कार्यकर्ते संघटित करत शक्तिप्रदर्शनाचा निर्णय घेतला. दोंडाईचा पोलिस ठाण्यात शुक्रवारी दुपारी दोनला माजी आमदार गोटे यांनी प्रभारी परिवीक्षाधीन पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांची भेट घेतली. त्यात फार्महाउसमधील प्रवेशाबाबत दाखल गुन्हा प्रकरणी हजर झाल्याचे गोटे यांनी सांगितले. त्यावर श्री. कुमावत म्हणाले, की तुम्हाला (गोटे) अजून बोलावलेले नाही. तपास सुरू आहे. चौकशीकामी रीतसर समन्स देऊन तपास अधिकारी उपस्थितीबाबत कळवतील. यावर श्री. गोटे यांनी येणाऱ्या काळात ग्रामपंचायतींच्या निवडणुका आहेत. त्यामुळे आधीच स्वतःहून हजर झाल्याचे सांगितले व ते पोलिस ठाण्यातून बाहेर पडले. 

रावल यांचे शक्तिप्रदर्शन 
पत्रकारांशी संवाद साधताना श्री. गोटे म्हणाले, की आमदार रावल यांचा खासगी फार्महाउस आहे, असे संबंधित कर्मचाऱ्यांनी सांगितल्यावर आम्ही तापी फार्महाउसमधून लगेच निघून गेलो. मोबाईल हिसकावणे वैगरे काहीच झाले नसताना गुन्हा दाखल केला. आमदार रावल यांनी फोन केला असता, तर असे करायची इच्छा नव्हती. येणाऱ्या काळात पुराव्यानिशी सर्व माहिती देऊ. दुसरीकडे श्री. गोटे यांना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजप व रावल समर्थक शेकडो कार्यकर्त्यांचे शक्तिप्रदर्शन सुरू होते. प्रतिमेला जोडो मारो आंदोलनातून श्री. गोटे यांचा निषेध व्यक्त करीत व त्यांनी दोंडाईचा सोडल्यावर रावल समर्थकांनी पांगत या प्रकरणी चर्चेला पूर्णविराम दिला. तत्पूर्वी, दोंडाईचात बघ्यांची गर्दी झाली. 
 
पोलिसांचा कडक बंदोबस्त 
दोंडाईचात राजकीय महानाट्यावरून तणाव निर्माण होऊ नये म्हणून कायदा- सुव्यवस्थाकामी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात होता. पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या देखरेखीत दंगा काबू पथकासह श्री. कुमावत, साक्रीचे उपअधीक्षक प्रदीप मैराळे, एलसीबीचे निरीक्षक शिवाजी बुधवंत, शिरपूरचे निरीक्षक हेमंत पाटील, शिंदखेडा, थाळनेरचे सहाय्यक उपनिरीक्षक प्रशांत दळवी, श्री. रसाळे आदींनी स्थितीवर नियंत्रण ठेवले. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi dhule news anil gote jaykumar rawal farm house entry issue