अहिराणीचे वर्चस्‍व वाढविले पाहिजे : भालचंद्र नेमाडे 

जगन्नाथ पाटील
Saturday, 26 December 2020

अहिराणी मुळातच चांगली भाषा आहे. इतर भाषिक अहिराणीला कमी लेखतात. खरंतर त्यांनी त्यांच्या भाषा सुधारायला हव्यात. भाषेतील लोक किती नवनवीन शोध लावतात. संवर्धन करतात.

कापडणे (धुळे) : मुघल काळात खानदेशाला मोठे महत्त्व होते. अहिराणीत बोलणारे व लिहिणारे वाढत आहेत. संस्कृतपेक्षा आधीची भाषा आहे. ही नॅचरल भाषा आहे. रोज काही भाषा मरत आहेत. पुढे एकतृतीयांश भाषा मरतील. अहिराणीचे वर्चस्व वाढविले पाहिजे. आपला अभिमानास्पद इतिहास आहे, असे विचार ज्ञानपीठ पुरस्कार विजेते भालचंद्र नेमाडे यांनी मांडले. 

उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळ व अहिराणी संवर्धन परिषदेतर्फे शनिवारपासून तीनदिवसीय ऑनलाइन विश्व अहिराणी साहित्य संमेलनाला गवराई पूजन व ग्रंथदिंडीने सुरवात झाली. त्या वेळी साहित्यिक नेमाडे बोलत होते. संमेलनाचे अध्यक्ष बापूसाहेब हटकर अध्यक्षस्थानी होते. पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील, कृषिमंत्री दादा भुसे, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, पद्मश्री राम सुतार, अॅड. उज्ज्वल निकम, कवी ना. धो. महानोर, सचिन गोस्वामी, सुभाष अहिरे, स्वागताध्यक्ष विकास पाटील, सदाशिव सूर्यवंशी व एन. एम. भामरे आदी उपस्थित होते. 

नेमाडे म्हणाले, की अहिराणी मुळातच चांगली भाषा आहे. इतर भाषिक अहिराणीला कमी लेखतात. खरंतर त्यांनी त्यांच्या भाषा सुधारायला हव्यात. भाषेतील लोक किती नवनवीन शोध लावतात. संवर्धन करतात. त्याच्यावर भाषेचे वैभव वाढते. अहिराणीत सर्व जाती धर्माचे लोक एकजुटीने राहतात. जातिभेद नाही. जातिभेद नष्ट करणारी अहिराणी आहे. दरम्यान, ग्रंथदिंडीत साहित्यिकांनी फुगड्या खेळत आनंद व्यक्त केला. स्वागताध्यक्ष विकास पाटील यांनी प्रास्ताविक करून आभार मानले. 

जन्मदात्या भाषेला विसरू नये 
जन्मदात्या भाषेला विसरू नये. खानदेशातील पाणी प्रश्न सुटला पाहिजे. तापीचे पाणी उचलले गेले पाहिजे. कोरडवाहू जमिनीचे बागायतीत रूपांतर झाले पाहिजे. खानदेशाचे रुपड बदलेल. 
-ना. धो. महानोर (ज्येष्ठ साहित्यिक )  

संपादन ः राजेश सोनवणे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi dhule news bhalchandra nemade ahirani sahitya samelan