ओल्या कचऱ्यापासून ऊर्जानिर्मिती; धुळ्यात साकारणार प्रकल्प 

रमाकांत घोडराज
Monday, 28 December 2020

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान सुरू झाले. या अभियानाच्या माध्यमातून शहरे हागणदारीमुक्त करणे व शहरातून निघणाऱ्या शेकडो टन घनकचऱ्याचे व्यवस्थापन करून शहरे स्वच्छ करणे हा उद्देश आहे.

धुळे : स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत धुळ्यात तब्बल १२ कोटी रुपये खर्चातून बायोगॅस प्रकल्प उभा राहणार आहे. या प्रकल्पासाठी नुकतीच स्थायी समितीने प्रशासकीय मान्यता दिली. त्यामुळे येत्या काळात महापालिकेचा बायोगॅस प्रकल्प उभा राहील. यातून ओल्या कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट, तर लागेलच शिवाय ऊर्जानिर्मितीही होणार आहे. 
केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान सुरू झाले. या अभियानाच्या माध्यमातून शहरे हागणदारीमुक्त करणे व शहरातून निघणाऱ्या शेकडो टन घनकचऱ्याचे व्यवस्थापन करून शहरे स्वच्छ करणे हा उद्देश आहे. त्याचाच एक भाग म्हणून घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ ची प्रभावी अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत राज्यातील ८० नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना शासनाने बायोगॅस प्रकल्पांसाठी १६०.८० कोटी रुपये खर्चाला जानेवारी २०२० मध्ये प्रशासकीय मान्यता दिली. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कचरा संकलन प्रणालीमार्फत संकलित होणारा घरगुती ओला कचरा, भाजी बाजार, मटण व चिकन मार्केटमधील विलगीकृत ओल्या (विघटनशील) ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी बायोगॅस प्रकल्प मंजूर केले आहेत. 

धुळ्याला १२ कोटी 
राज्यातील ८० शहरांमध्ये धुळे शहराचाही समावेश होता. यात धुळे महापालिकेच्या माध्यमातून बायोगॅस प्रकल्प उभारण्यासाठी शासनाने १२ कोटी रुपये मंजूर केले होते. या १२ कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी खर्चाची जबाबदारी केंद्र, राज्य शासन तसेच संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना उचलायची आहे. धुळ्यासाठी मंजूर प्रकल्पात केंद्र शासनाचा हिस्सा ३५ टक्के, राज्य शासनाचा हिस्सा २३.३ टक्के व उर्वरित खर्च महापालिकेला उचलावा लागणार आहे. 

३० टीपीडी क्षमता 
धुळ्यासाठी मंजूर झालेला बायोगॅस प्रकल्प ३० टीपीडी (tonnes per day) क्षमतेचा आहे. या प्रकल्प उभारण्याच्या विषयाला नुकतीच स्थायी समितीने प्रशासकीय मंजुरी दिली. त्यामुळे निविदा प्रक्रिया राबवून येत्या काळात या प्रकल्प उभारणीच्या कामाला गती येईल. धुळे महापालिकेच्या माध्यमातून महापालिका हद्दीतील वरखेडी रोडवरील गांडूळ खत प्रकल्पाजवळच हा प्रकल्प उभा राहील, अशी शक्यता आहे. या प्रकल्पातून निर्माण होणारी ऊर्जा (बायोगॅस) वीजनिर्मिती, वाहनांचे इंधन अथवा घरगुती गॅस पुरवठ्यासाठीही होऊ शकेल. 
 
प्रकल्पासाठी हिस्सेदारी अशी 
-केंद्र शासन : चार कोटी २० लाख 
-राज्य शासन : दोन कोटी ७९ लाख ६० हजार 
-धुळे महापालिका : पाच कोटी ४० हजार 
-मनपाचे अंदाजपत्रक : ११ कोटी ८० लाख २२ हजार ४३ रुपये 
 
कचऱ्याची सद्यःस्थिती अशी 
-रोजचा एकूण कचरा : ११४ टन 
-ओला कचरा साधारण : ६० टन 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi dhule news biogas project dhule corporation devolop