‘बर्डफ्ल्‍यू’ची भिती; पोल्‍ट्रीफॉर्म रिकामे तेही नुकसान देवूनच

महेंद्र खोंडे
Sunday, 10 January 2021

शेती व्यवसायात सतत नुकसान होत आसल्याने अनेक सुशिक्षीत बेरोजगार तरूनांनी शेतीला जोड धंदा म्हणून कुक्कुट पालन व्यवसायाला पसंती दिली. यामध्ये बॉयलर, कडकनाथ, कल्याणी, गावरानी जातीच्या पिलांचे संगोपण करून दोन पैसे कमविण्याचे मृगजळी स्वप्न पाहिले.

तऱ्हाडी (धुळे) : शेतीला जोड धंदा म्हणून तऱ्हाडी- वरूळ परीसरामध्ये अनेक तरूणांनी पोल्ट्रीद्वारे कुक्कुट व्यवसायाला पाच- सहा वर्षापासुन सुरवात केली. कोरोनाच्या संकटातून निघाल्‍यानंतर आता बर्डफ्ल्यु आल्‍याने कुक्‍कूटपालन करणाऱ्यांचे नुकसान भरून निघणे कठीण झाले. बर्डफ्ल्‍यू आल्‍याने पोल्‍ट्रीफॉर्म रिकामे होवू लागले असून, यात नुकसानीच करावे लागत आहे.
शेती व्यवसायात सतत नुकसान होत आसल्याने अनेक सुशिक्षीत बेरोजगार तरूनांनी शेतीला जोड धंदा म्हणून कुक्कुट पालन व्यवसायाला पसंती दिली. यामध्ये बॉयलर, कडकनाथ, कल्याणी, गावरानी जातीच्या पिलांचे संगोपण करून दोन पैसे कमविण्याचे मृगजळी स्वप्न पाहिले. यामध्ये काही युवकांनी वेगवेगळ्या खाजगी कंपन्यासोबत करार करून सुमारे दहा हजार पक्ष्यांचे संगोपन केल्या जाईल ऐवढे मोठे शेड निर्माण केले. आधी कोरोनामुळे जतन केलेल्या कोंबड्यांना मातीमोल किंमतीने विक्री करावी लागली. नुकतेच कुठे लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता आल्याने नव्या जोमाने कुक्कुट पालन व्यवसायाला प्रारंभ केला. 

लाखोचे नुकसान
आता कोंबड्यावर बर्डफ्ल्यु आजार आल्याच्या भितीने अनेक कुक्कुट पालक धास्तावले आहेत. या अफवेने प्रत्येक व्यवसायीकाचे लाखों रूपयांचे नुकसान होणार आहे. कारण एका फॉर्मवर सुमारे पाच ते दहा हजारापर्यंत पक्षी मर्यादा आहे. एका पिलांचे सांभाळ करतांना सुमारे दिड महिन्यात हा पक्षी विक्रिस येतांना खर्च सुमारे 170 ते 180 रूपये खर्च येतो. तर हल्ली 50 ते 60 रूपये या किरकोळ दराने कोंबडी विक्री करावी लागत आहे. अनेकांनी मिळेल त्या दराने कोंबड्यांची विक्री केल्याने वेळे आधीच अनेक पोल्ट्री फॉर्म रिकामे झाल्याचे चित्र तऱ्हाडी- वरूळ परीसरामध्ये स्पष्ट दिसत आहे.

कुक्‍कुट पालनाला मिळावा विमा कवच!
शेती व्यवसायाला जोड धंदा म्हणून कुक्कुट पालन शेतकऱ्यांनी करावे अशा प्रकारचे सल्ले अनकांकडुन मिळतात. परंतु सततच्या रोगराईमुळे कुक्कुट पालन व्यवसायीक आर्थिक संकटामध्ये जात आहेत. कुक्कुट पालन व्यवसाय हा शेतीशी निगडीत आसल्याने शेती पिकासमान कुक्कुट पालन व्यवसायाला सुध्दा शासनाचे विमा कवच मिळाले तरच या व्यवसायाला आधार मिळेल असे मत कुक्‍कूट पालन करणारे महेंद्र डामरे यांनी सांगितले.

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi dhule news bird flu virus poultry farm loss