मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत धुळे जिल्ह्यासाठी ३२ कोटींचा निधी मंजूर 

gram sadak yojana
gram sadak yojana

निजामपूर (धुळे) : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत धुळे जिल्ह्यातील १२ मुख्य मार्गांवरील पुलांसाठी शासनाने नुकताच ३२ कोटींचा निधी मंजूर केला असून त्यांपैकी सुमारे २० कोटींपेक्षाही जास्त निधी राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे यांनी शिंदखेडा मतदार संघासाठी खेचून आणला आहे. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून त्यांनी महाराष्ट्र शासनासह ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे विशेष आभार मानले आहेत. 

कोणत्याही पदावर नसताना संदीप बेडसेंनी साक्री व शिंदखेडा तालुक्यातील ९ मुख्य मार्गांवरील पुलांसाठी निधी खेचून आणला आहे. संदीप बेडसेंनी २४ नोव्हेंबर २०२० ला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन यासंदर्भातील मागण्यांचे निवेदन दिले होते. त्याची दखल घेत १ मार्चला ग्रामविकास विभागामार्फत प्रशासकीय मान्यतेचा शासनादेश निर्गमित झाला. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या (एडीबी टप्पा-२) अंतर्गत धुळे जिल्ह्यातील पुलांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाल्याने मंजूर पुलांचे काम युद्धपातळीवर पूर्ण झाल्यास जनसामान्यांची मोठी सोय होणार आहे. 

साक्री तालुक्‍यातील काम 
साक्री तालुक्यात ४मुख्य मार्गांवर पुलांचे बांधकाम होणार आहे. त्यात दुसाणे-फोफादे-आखाडे-वाजदरे रस्त्यावरील पुलाचे बांधकाम, आगरपाडा-बळसाणे-कर्ले रस्त्यावरील पुलाचे बांधकाम, साक्री-भाडणे-नांदगाव-बेहेड रस्त्यावरील पुलाचे बांधकाम, महामार्गा-६ पासून ते मिहीर-टेंभे-कृष्णनगर रस्त्यावरील पुलाचे बांधकाम. 

शिंदखेडा तालुक्‍यातील काम 
शिंदखेडा तालुक्यात ५ मुख्य मार्गांवर पुलांचे बांधकाम होणार आहे. त्यात एमएसएच-१पासून मेथी ते खर्दे रस्त्यावरील ०/२९५ पुलाचे बांधकाम, रोहाणे ते चिमठावळ रस्त्यावरील पुलाचे बांधकाम, रामा-१० ते रुदाणे (भाग रेवाडी-वाडी ते रुदाणे) रस्त्यावरील २/०७० पुलाचे बांधकाम, रामा-१० ते रुदाणे (भाग रेवाडी-वाडी ते रुदाणे) २/६१० रस्त्यावरील पुलाचे बांधकाम, रामा-१० ते रुदाणे (भाग रेवाडी-वाडी ते रुदाणे) रस्त्यावरील ७/२९० पुलाचे बांधकाम हे सर्व तालुक्यांतील महत्त्वाच्या गावांना जोडणारे रस्ते असून त्या रस्त्यांवरील पुलांचे काम २०१४पासून रखडले होते. मात्र महाविकास आघाडी शासनाने शिंदखेडा मतदारसंघातील या मुख्य रस्त्यांवरील पुलांच्या कामाला प्राधान्याने मंजुरी दिली आहे. 
 
मंजूर निधी याप्रमाणे 
साक्री तालुका : ११ कोटी ९१ लाख ३८ हजार 
शिंदखेडा तालुका : ८ कोटी ६४ लाख ५२ हजार 
एकूण निधी : २० कोटी ५५ लाख ९० हजार 
 
शिंदखेडा विधानसभा मतदार संघातील गावांसाठी २०१४ पासून आढावा घेत आरोग्य, सिंचन, रस्त्यांसह अनेक समस्यांचा मी पाठपुरावा करतोय. आगामी काळात रखडलेल्या कामांना तत्काळ मंजुरी मिळवून तालुक्याच्या विकासासाठी कटिबद्ध राहील. अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा निधी मंजूर झाला असून मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह महाविकास आघाडी शासनाचे विशेष आभार, 
-संदीप बेडसे, माजी जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, धुळे 

संपादन ः राजेश सोनवणे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com