मोदी चले जावचा नारा देत‌ उत्तर महाराष्ट्र काँग्रेसमय करण्याची तयारी : आमदार पाटील 

निखील सुर्यवंशी
Sunday, 14 February 2021

पक्षाने दिलेली जबाबदारी सार्थ ठरवेल. भाजपने देशाची फसवणूक केली आहे. त्यामुळे देशासह राज्याला काँग्रेसच्या धर्मनिरपेक्ष विचारांची गरज आहे.

धुळे : उत्तर महाराष्ट्रात पूर्वी विविध मतदारसंघासह स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेसचा झेंडा फडकत होता. ते गतवैभव मिळवून देण्यासाठी, हा विभाग काँग्रेसमय करण्यासाठी प्रदेश कार्याध्यक्षपदाच्या माध्यमातून अहोरात्र परिश्रमाची तयारी आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनीही भक्कम साथ द्यावी, असे आवाहन आमदार कुणाल पाटील यांनी केले. 

काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी निवडीनंतर आणि पदभार स्वीकारल्यानंतर आमदार पाटील शनिवारी (ता. १३) दुपारी येथे दाखल झाले. तत्पूर्वी, आगमनावेळी त्यांचे नाशिकसह मालेगाव, झोडगे, रामनगर, पुरमेपाडा, आर्वी, अवधान, लळींग, रेसीडेन्सी पार्क येथे असंख्य कार्यकर्त्यांनी पुष्पवृष्टी करत आमदार पाटील यांचे जंगी स्वागत केले. नंतर ते शहरातील काँग्रेस भवनात उपस्थित झाले. आमदार पाटील, आणि माजी मंत्री रोहिदास पाटील या पितापुत्राचा जिल्हाध्यक्ष श्‍यामकांत सनेर, शहराध्यक्ष युवराज करनकाळ यांच्यासह पक्षाच्या विविध शाखा, कार्यकर्त्यांकडून जंगी सत्कार झाला. 
 
पुन्हा आमदार होणार 
आमदार पाटील म्हणाले, की पक्षाने दिलेली जबाबदारी सार्थ ठरवेल. भाजपने देशाची फसवणूक केली आहे. त्यामुळे देशासह राज्याला काँग्रेसच्या धर्मनिरपेक्ष विचारांची गरज आहे. ते जनमानसात प्रतिबिंबित करण्यासह पुढील विविध निवडणुकांमध्ये भाजपला धूळ चारण्यासाठी तळागाळातील कार्यकर्त्याला ताकद देण्याचे काम काँग्रेस करेल. त्यांना सोबत घेऊन पुन्हा आमदार होणार आहे, तसेच उत्तर महाराष्ट्रात सर्वत्र पक्षाचे आमदार निवडून आणायचे आहेत. त्यासाठी कार्यकर्त्यांनी काँग्रेसला क्रमांक एकचा पक्ष बनवायचा ध्यास बाळगावा. श्री. सनेर यांनी आमदार पाटील कार्यकर्तृत्वाच्या बळावर प्रदेश कार्याध्यक्ष झाले असून ही अभिमानाची बाब असल्याचे सांगितले. नाशिक जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी ताकदीनिशी नाशिक जिल्हा आमदार पाटील यांच्या पाठीशी राहील, अशी ग्वाही दिली. ज्येष्ठ नेते एम. जी. धिवरे, रमेश श्रीखंडे, माजी आमदार डी. एस. अहिरे यांनी मार्गदर्शन केले. 
 
मान्यवरांकडून सत्कार 
माजी खासदार बापू चौरे, ज्येष्ठ नेते रमेश श्रीखंडे, महिला काँग्रेस अध्यक्षा गायत्री जयस्वाल, साबीर शेख, मालेगावचे शांताराम लाठर, गुलाबराव कोतेकर, धुळे तालुकाध्यक्ष भगवान पाटील, कार्याध्यक्ष अशोक सुडके, भगवान गर्दे, सरपंच नागेश देवरे, साक्री पंचायत समिती सभापती प्रतिभा सूर्यवंशी, शिरपूर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मनोहर पाटील, उत्तम माळी, रणजीत पावरा, अभिमन भोई, साक्री तालुकाध्यक्ष भानुदास गांगुर्डे, दीपक साळुंके, जिल्हा सरचिटणीस डॉ. दरबारसिंग गिरासे, पंढरीनाथ पाटील, रितेश पाटील, लहू पाटील, स्वप्निल पाटील, प्रमोद सिसोदे, अलोक रघुवंशी, मुझफ्फर हुसेन, विजय देवरे, डॉ. हेमंत भदाणे, डॉ. विजय पाटील, किरण नगराळे आदींसह कार्यकर्त्यांनी आमदार पाटील यांचा सत्कार केला. 
 
`मोदी चले जाव`चा नारा 
काँग्रेसचा `मोदी चले जाव`, `भाजपचा चले जाव`चा नारा आहे. तो कार्यकर्त्यांनीही द्यावा, असे आवाहन आमदार पाटील यांनी करताच काँग्रेस भवन घोषणांनी दणाणले. त्यासाठी `मोदी चले जाव`ची मोहीम राबविणार आहे, असे आमदार पाटील म्हणाले. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi dhule news congress mla kunal patil narendra modi