कोट्यवधींचा निधी असताना ‘सिव्हिल'ला आयसीयू नाही; मनुष्यबळासह ११ व्हेंटिलेटर घेण्याबाबत हिरे महाविद्यालयाची भूमिका  

ventilator
ventilator

धुळे : अनेक गरजू रूग्णांचा व्हेंटीलेटरअभावी मृत्यू होत असताना येथील साक्री रोडवरील सिव्हिल हॉस्पिटलला मिळालेले २५ व्हेंटीलेटर धूळखात पडून आहेत. वर्षभरापासूनची ही विदारक स्थिती असताना ते ११ व्हेंटीलेटर हिरे वैद्यकीय शासकीय महाविद्यालयाच्या जिल्हा सर्वोपचार रूग्णालयास देण्याची भूमिका सिव्हिल हॉस्पिटलने घेतली आहे. मात्र, मनुष्यबळासह ते व्हेंटीलेटर स्विकारू, अशी भूमिका हिरे महाविद्यालय व्यवस्थापनाने घेतली आहे. यातून रूग्णांचे बरे- वाईट झाले तरी चालेल पण मनुष्यबळाच्या नावाखाली जबाबदारी स्विकारायची नाही, असे संतापजनक चित्र समोर येत आहे. 
अनेक कोविड आणि नॉन- कोविड रूग्णांचे नातेवाइक व्हेंटीलेटरसाठी जीवाचे रान करत आहेत. जिल्ह्यात ते उपलब्ध होत नसल्याने सुरत, नाशिक, मुंबई, पुणे येथे गरजू रूग्णांना जावे लागत आहे. वैद्यकीय सल्ल्यानंतरच व्हेंटीलेटरची मागणी होते. त्यामुळे आपला रूग्ण वाचेल, अशा आशेने संबंधित नातेवाइक अहोरात्र व्हेंटीलेटर मिळण्यासाठी पळापळ करताना दिसतात. 

व्हेंटीलेटरबाबत वास्तव 
संसर्गजन्य कोरोना विषाणूचा जिल्ह्यात कहर झाला असताना वर्षभरापासून खासगी वैद्यकीयस्तरावर ४५, तर हिरे वैद्यकीय महाविद्यालयाकडील ५५ पैकी कार्यरत ४५ व्हेंटीलेटर कार्यरत आहेत. याशिवाय सिव्हिल हॉस्पिटलला मिळालेले २५ व्हेंटिलेटर अक्षरशः धूळखात पडून असल्याने राजकीय क्षेत्रासह रूग्णांकडून संताप व्यक्त केला आहे. यात सिव्हिलचे ११, शिरपूर उपजिल्हा रूग्णालयास दिलेले ९, दोंडाईचा उपजिल्हा रूग्णालयास दिलेले ५, असे एकूण २५ व्हेंटीलेटर विनावापर आहेत. 

असमर्थनीय युक्तीवाद 
जिल्ह्यातील हा गंभीर प्रकार उजेडात आल्यानंतर शासकीय वैद्यकिय अधिकाऱ्यांना मनुष्यबळाच्या कमतरतेची आठवण झाली. व्हेंटीलेटरसाठी सिव्हिलमध्ये आयसीयू नाही, कुशल डॉक्टर (फिजिशियन), कर्मचारी नसल्याने २५ व्हेंटीलेटर पडून असल्याचा असमर्थनीय युक्तीवाद सिव्हिलचे वैद्यकीय अधिकारी करत आहेत. मग याप्रश्‍नी वर्षभरात तोडगा काढण्याचा, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सहकार्य घेण्याचा प्रयत्न सिव्हिलच्या अधिकाऱ्यांनी का केला नाही? 

निधी खर्चाबाबत संभ्रम 
कोरोनाबाबत उपाययोजनांसाठी जिल्ह्याला २०२०- २०२१ साठी ३१ कोटी ३५ लाखांचा निधी मिळालेला असताना त्यातून सिव्हिलमध्ये आयसीयूची सुविधा निर्माण करण्याचे का सुचले नाही? प्राप्त ३१ कोटींपैकी १६ कोटींचा निधी मोजके आरोग्य केंद्र, उपकेंद्राच्या बांधकामासाठी वापरणे योग्य की प्रथम रूग्णांचे जीव वाचविण्यासाठी सिव्हीलमध्ये आयसीयूची सुविधा निर्माण करणे गरजेचे, याबाबत वर्षभरात निर्णय का होऊ शकला नाही? पालकमंत्र्यांनी कंत्राटी पद्‌धतीने डॉक्टर, कर्मचाऱ्यांची भरती करणे, आयएमए संघटनेची मदत घेण्याची सूचना केली. तसे प्रयत्न व्हेंटीलेटरबाबत वर्षभरात का होऊ शकले नाही, असे अनेक प्रश्‍न धुळेकरांच्या मनात घर करून आहेत. 

संपादन- राजेश सोनवणे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com