
आपल्या स्वतःच्या आरोग्यासह इतर नागरिकांची पर्यायाने शहराचे आरोग्य आपल्या हाती असल्याने दक्षता घ्या, प्रशासनाने केलेल्या सूचनांचे पालन करा
धुळे : शहरात विनामास्क फिरणाऱ्या वाहनधारकांना स्वतःच्या हाताने मास्क लावत घराबाहेर पडल्यावर मास्क लावत जा आणि स्वतःसह इतरांच्या आरोग्याची काळजी घ्या असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी केले.
पोलीस स्थापना दिनानिमित्ताने शहर वाहतूक शाखा व रोटरॅक्ट क्लब यांच्यातर्फे आज (ता. ८) शहरातील कमलाबाई कन्या शाळेजवळील शैक्षणिक चौकात वाहनधारक, विद्यार्थी, शिक्षक आदींना मास्क व सॅनिटायझर वाटपाचा कार्यक्रम घेतला. पोलीस अधीक्षक श्री. पंडित, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख, वाहतूक शाखेचे वाय. जी. गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक दिलीप माळी,पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर पाटील, जितेंद्र आखाडे, मनोहर महाले, रोटरॅक्ट क्लबचे रोहित अग्रवाल, दीपम शहा, आशिष अग्रवाल, गीता जानी, सुनील मुंदडा, आर. वाय. पाटील, दीपक जैन, हर्शल अग्रवाल आदी उपस्थित होते.
कोरोनाचा प्रभाव कायम
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रभाव कमी झालेला दिसत असला तरी धोका टळलेला नाही. मात्र अनेक नागरिक मास्क न लावताच शहरात बिनधास्त फिरतात. अशा मास्क न लावणाऱ्या नागरिकांनी मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करण्याबाबत या कार्यक्रमातून आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाच्या ठिकाणी स्वतः पोलीस अधीक्षक श्री. पंडित, अपर पोलीस अधीक्षक श्री. बच्छाव यांनी मास्क न लावलेल्या वाहनधारकांना स्वतःच्या हाताने मास्क लावत काळजी घेण्याचे आवाहन केले. आपल्या स्वतःच्या आरोग्यासह इतर नागरिकांची पर्यायाने शहराचे आरोग्य आपल्या हाती असल्याने दक्षता घ्या, प्रशासनाने केलेल्या सूचनांचे पालन करा असे आवाहन या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आले.
संपादन ः राजेश सोनवणे