esakal | धुळे जिल्हा आणीबाणीकडे; रेमडेसिव्हिर, ऑक्सिजनसाठी काळपात 

बोलून बातमी शोधा

corona-virus

दिवसभर राज्य, परराज्यातून रेमडेसिव्हिर इंजेक्शन, ऑक्सिजन मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी संजय यादव मंत्रालयीन वरिष्ठ अधिकारी, उत्पादन कंपन्या, होलसेलसर, डिस्ट्रिब्यूटरशी रात्री उशिरापर्यंत संपर्कात होते. 

धुळे जिल्हा आणीबाणीकडे; रेमडेसिव्हिर, ऑक्सिजनसाठी काळपात 
sakal_logo
By
निखील सुर्यवंशी

धुळे : शहरासह जिल्ह्यात संसर्गजन्य कोरोना विषाणूबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यात रुग्णांबरोबर बेडसह रेमडेसिव्हिर इंजेक्शन, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची मागणी आणखी वाढल्याने जिल्हाधिकारी संजय यादव यांची हातघाईची लढाई सुरू झाली आहे. जिल्ह्यात आणीबाणीची स्थिती निर्माण होण्याकडे वाटचाल सुरू झाल्याने शनिवारी (ता.१०) दिवसभर राज्य, परराज्यातून रेमडेसिव्हिर इंजेक्शन, ऑक्सिजन मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी संजय यादव मंत्रालयीन वरिष्ठ अधिकारी, उत्पादन कंपन्या, होलसेलसर, डिस्ट्रिब्यूटरशी रात्री उशिरापर्यंत संपर्कात होते. 
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात श्री. यादव यांनी वैद्यकीय व्यावसायिकांची बैठक बोलावली. सीईओ वान्मती सी., महापालिकेचे आयुक्त अजीज शेख, हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड आदींसह वैद्यकीय व्यावसायिक उपस्थित होते. 

आगामी दिवस परिक्षेचे 

कोरोनामुळे जिल्ह्यात आगामी काहा दिवस कठीण परीक्षेचे असू शकतील. या काळात ऑक्सिजन आणि औषधांचा तुटवडा जाणवू शकतो. जिल्हा प्रशासन वैद्यकीय व्यावसायिकांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असले, तरी ऑक्सिजन आणि औषधांचा जिल्ह्याबाहेरून पुरवठा होतो. ही स्थिती लक्षात घेता वैद्यकीय व्यावसायिकांनी ऑक्सिजन आणि आवश्यक औषधांचा किमान २४ तास पुरेल इतका साठा उपलब्ध करून ठेवताना त्याचा काळजीपूर्वक वापर करावा. त्यानुसार नियोजन करावे. जिल्ह्यात ऑक्सिजनचा एकमेव पुरवठादार असून, तो धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत पुरवठा करतो. जिल्ह्याची एकूण मागणी १२.५ टन आहे. तीच स्थिती रेमडेसिव्हिर इंजेक्शनची आहे. जिल्ह्याला प्राप्त या इंजेक्शनचा पुरवठा समितीतील जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्याधिकारी, वैद्यकीय व्यावसायिकांचे प्रतिनिधी, केमिस्ट असोसिएशनचे प्रतिनिधी रोज करतात. अशा परिस्थितीत प्रत्येकाने मानवतेचे, सदभावनेचे दर्शन घडविणे आवश्यक आहे. 
 
सिलिंडर घरी नेतात..
अनेक रुग्ण आवश्यकता नसताना घरीच ऑक्सिजन सिलिंडर लावून घेत आहेत. अशा रुग्णांचा शोध घेऊन त्यांना शासकीय कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी दाखल केले पाहिजे. जिल्ह्यात ऑक्सिजन आणि इंजेक्शनचा दुरुपयोग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गरजू रुग्ण ऑक्सिजन आणि इंजेक्शनपासून दूर राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. ऑक्सिजनची माहिती उपलब्ध व्हावी म्हणून ऑक्सिजन अधिकारी नियुक्त केला आहे. त्यांनी सर्व रुग्णालयांच्या संपर्कात राहून ऑक्सिजन उपलब्धतेबाबतचा अहवाल वेळेत सादर करावा. तसेच मोठ्या रुग्णालयांनी समन्वयाने काम करीत कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेली महामारीची परिस्थिती हाताळावी, असेही आवाहन जिल्हाधिकारी यादव यांनी केले. 
 
जिल्हाधिकारी संजय यादव म्हणाले... 
- जिल्हा प्रशासन वैद्यकीय व्यावसायिकांच्या पाठीशी 
- उपलब्ध साठ्यानुसार रुग्णांचे नियोजन करावे 
- ऑक्सिजन, रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा गैरवापर टाळावा 
- घरी ऑक्सिजन लावणाऱ्यांना रुग्णालयात दाखल करावे 
- आवश्यक असेल, तरच रेमडेसिव्हिर इंजेक्शन वापरावे 
- विनामास्क फिरणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी 
- सर्वच रुग्णालयांनी पर्यायी आराखडा तयार ठेवावा 
- जिल्ह्यातील नागरिकांनी विनाकारण फिरणे टाळावे 

संपादन- राजेश सोनवणे