esakal | धुळ्यात बिनधास्तपणा अंगलट; कोरोनाबाधितांमध्ये झपाट्याने वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

corona

धुळे शहरासह जिल्ह्यात गेल्या वर्षी १० एप्रिलला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. गेल्या दहा-अकरा महिन्यांत कोरोनाबाधितांच्या आकड्याने १५ हजारांचा टप्पा पार केला. दरम्यान, गेल्या एक-दोन महिन्यांपासून कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याचे दिसत असल्याने समाधान होते.

धुळ्यात बिनधास्तपणा अंगलट; कोरोनाबाधितांमध्ये झपाट्याने वाढ

sakal_logo
By
रमाकांत घोडराज

धुळे : गेल्या दहा-अकरा महिन्यांपासून कोरोनाचे संकट झेलणाऱ्या जिल्हावासीयांना कोरोनाचे संकट आता जाईल, अशी अपेक्षा असताना पुन्हा एकदा हे संकट परत येतेय की काय, अशी भीती आहे. अर्थात या संकटाला पुन्हा निमंत्रण देण्यासाठी नागरिकांचा असंवेदनशील व बिनधास्तपणाही तेवढाच कारणीभूत ठरणार आहे. गेल्या तीन दिवसांत कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली आहे. शनिवारी (ता. २०) सायंकाळी पाचपर्यंतच बाधितांच्या संख्येने ‘हाफ सेंच्युरी’ मारली, तर एका बाधिताचा मृत्यूही झाला. 
धुळे शहरासह जिल्ह्यात गेल्या वर्षी १० एप्रिलला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. गेल्या दहा-अकरा महिन्यांत कोरोनाबाधितांच्या आकड्याने १५ हजारांचा टप्पा पार केला. दरम्यान, गेल्या एक-दोन महिन्यांपासून कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याचे दिसत असल्याने समाधान होते. मात्र, संकट टळलेले नाही. त्यामुळे काळजी घ्या, नियम पाळा, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात होते. या आवाहनाला केराच्या टोपलीत टाकून नागरिकांनी बिनधास्तपणा स्वीकारला. त्यामुळे कोरोनाचे संकट पुन्हा पाय पसरणार की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. 

तीन दिवसांत सव्वाशे 
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रभाव कमी झाल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या घटली होती. १ फेब्रुवारीला जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ११ होती. २ फेब्रुवारीला ही संख्या दहा वर आली, तर ३ फेब्रुवारीला जिल्ह्यात केवळ तीनच बाधित आढळले होते. १४-१५ दिवसांनंतर ही संख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसते. गेल्या तीनच दिवसांत जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत १२१ ने भर पडली आहे. यात १८ फेब्रुवारीला २८, १९ फेब्रुवारीला ३८, तर शनिवारी (ता. २०) तब्बल ५५ कोरोनाबाधित आढळले. 

१९ दिवसांनंतर मृत्यू 
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येपेक्षा कोरोनाबळींची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे गेल्या काही महिन्यांपासून पाहायला मिळत आहे. कोरोनाचे बळी नगण्य असल्यागत स्थिती जिल्हावासीयांसह यंत्रणेला समाधान देणारी आहे. दरम्यान, गेल्या १९ दिवसांनंतर शनिवारी पुन्हा एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्याचे समोर आले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात कासारे (ता. साक्री) येथील ८० वर्षीय कोरोनाबाधित पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यापूर्वी १ फेब्रुवारीला कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला होता. 
 
बाधितांची स्थिती अशी 
- १ फेब्रुवारी ... १४,८३७ 
- १६ फेबुवारी ... १४,९८५ 
- १७ फेब्रुवारी ... १५,००२ 
- २० फेब्रुवारी ... १५,१२३ 

जिल्ह्यातील बळी असे 
एकूण ... ३९२ 
धुळे मनपा क्षेत्र ... १७४ 
उर्वरित जिल्हा ... २१८ 

५५ पैकी ५१ धुळ्यातले 
शनिवारी सायंकाळी पाचपर्यंतच्या दैनंदिन अहवालानुसार जिल्ह्यात ५५ कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. यातील तब्बल ५१ बाधित हे धुळे मनपा हद्दीतील आहेत, हे विशेष. उर्वरित चार सटाणा रोड, पिंपळनेर, मुकटी, मोरदड व नेर (ता. धुळे) येथील आहेत. 

संपादन ः राजेश सोनवणे