थकबाकीप्रश्‍नी पाच दुकाने सील; धुळे जिल्हा क्रीडा संकुलात कारवाई 

रमाकांत घोडराज
Thursday, 21 January 2021

जिल्हा क्रीडा संकुल,गरुड मैदान व्यापारी संकुलातील दुकानांचे भाडे भरणे, थकबाकी भरणे, भाडेपट्टा करारनामा करणे आदींबाबत अधिकाऱ्यांनी प्रतिसादाचे आवाहन केले. अन्यथा, दुकाने सील करण्याचा इशारा त्यांनी दिला. 

धुळे : शहरातील वाडीभोकर रोडवरील जिल्हा क्रीडा संकुलात भाडे थकबाकीप्रश्‍नी पाच दुकाने सील करण्यात आले. जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाच्या पथकाने सोमवारी (ता. २१) सरासरी साडेआठ लाख रुपयांच्या वसुलीपोटी ही धडक कारवाई केली. 

भाडे वसुलीबाबत वारंवार सूचना, नोटीस बजावूनही योगेश चव्हाण, भटू माळी, विनोद साळुंखे, नाना साळुंखे, पी. बी. पाटील आदींनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांच्याकडील थकीत सरासरी तीन लाख ९० हजाराचे भाडे, तसेच चार लाख ५६ हजाराची अनामत रक्कम, असे मिळून आठ लाख ४६ हजाराच्या वसुलीसाठी पथकाने ही कारवाई केली. तसेच क्रीडा संकुलालगत अतिक्रमण न करणे, तसेच फेरीवाल्यांना ताकीद देण्यात आली. जिल्हा क्रीडाधिकारी सुनंदा पाटील, क्रीडाधिकारी एन. एन. चंदर, आत्माराम बोथीकर, लिपिक डी. जी. वाघेला, सिद्धार्थ कदम, कोठावदे, श्रीमती भामरे, योगेश देवरे, मदन गावीत, ज्ञानेश्वर जाधव, राहुल देवरे, शुभम फुलपगारे, आकाश चौधरी, दीपक बाविस्कर आदी कारवाईवेळी उपस्थित होते. जिल्हा क्रीडा संकुल,गरुड मैदान व्यापारी संकुलातील दुकानांचे भाडे भरणे, थकबाकी भरणे, भाडेपट्टा करारनामा करणे आदींबाबत अधिकाऱ्यांनी प्रतिसादाचे आवाहन केले. अन्यथा, दुकाने सील करण्याचा इशारा त्यांनी दिला. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi dhule news corporation action shop seal rent exhausted