esakal | कंत्राटी कामगारांच्या कामावर प्रश्‍नचिन्ह! 
sakal

बोलून बातमी शोधा

dhule corporation

महापालिकेच्या मलेरिया व आरोग्य विभागात दैनंदिन साफसफाई, मलेरिया फवारणी आदी कामांसाठी खासगी ठेकेदाराकडून कामगार वाढविण्याचा विषय समितीपुढे होता.

कंत्राटी कामगारांच्या कामावर प्रश्‍नचिन्ह! 

sakal_logo
By
निखील सुर्यवंशी

धुळे : महापलिकेच्या मलेरिया, आरोग्य विभागात खासगी ठेकेदाराकडून (कंत्राटी) घेतलेले कामगार कोणत्या प्रभागात किती आहेत, ते कुठे काम करतात, याची माहिती आधी द्या, नंतर कामगार वाढविण्याचा निर्णय घेऊ, अशी भूमिका स्थायी समिती सभेत सदस्यांनी घेतली. यावर सभापतींसह प्रशासनाने सारवासारव करत संबंधित कामगारांबाबत सदस्यांना इत्यंभूत माहिती पुरविली जाईल, असे आश्‍वासन देत विषय मंजूर करून घेतला. 
महापालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक सभा गुरुवारी (ता. ३१) सकाळी अकराला महापालिका सभागृहात झाली. सभापती सुनील बैसाणे, उपायुक्त शांताराम गोसावी, नगर सचिव मनोज वाघ, सदस्य व अधिकारी उपस्थित होते. 

सदस्यांचा प्रश्‍न 
महापालिकेच्या मलेरिया व आरोग्य विभागात दैनंदिन साफसफाई, मलेरिया फवारणी आदी कामांसाठी खासगी ठेकेदाराकडून कामगार वाढविण्याचा विषय समितीपुढे होता. याविषयावर सदस्य कमलेश देवरे, अमोल मासुळे यांनी प्रभागात काम करणाऱ्या अशा कामगारांबाबत आम्हाला माहिती नसते. त्यामुळे त्याबाबत माहिती द्यावी, अशी मागणी केली. युवराज पाटील यांनीही प्रभागात कामगार वाढविण्याची मागणी केली असता कार्यवाही झाली नाही, एक कामगार गांजा पिऊन मुकादमाला शिवीगाळ करतो, अशी तक्रार केली. यापूर्वीच्या कामगारांची माहिती द्यावी तोपर्यंत विषय तहकूब करा, अशी सदस्यांची मागणी होती. 

आश्‍वासन देत मंजुरी 
सदस्यांच्या या प्रश्‍नांवर सभापती बैसाणे यांनी नगरसेवकांच्या मागणीनुसारच हा विषय घेतला आहे. त्यामुळे विषय मंजूर करून हा प्रश्‍न मार्गी लावू, सदस्यांना सर्व माहिती पुरविली जाईल, अशी भूमिका घेतली. उपायुक्त गोसावी यांनी शुक्रवारी (ता. १) सकाळी अकरापर्यंत सर्व नगरसेवकांना कामगारांची माहिती पुरविली जाईल, असे आश्‍वासन दिले. हा विषय मंजूर करण्यात आला. 

बायोमेट्रिक हजेरी घ्या 
महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांसह खासगी ठेकेदाराकडील कामगारांचीही बायोमेट्रिक हजेरी सुरू करा, असा आदेश उपायुक्त गोसावी यांनी अधिकाऱ्यांना दिला. कुणी कामगार गांजा पिऊन कामावर येत असेल, तर ही गंभीर व लाजीरवाणी बाब असून, अशा कामगाराला निलंबित करा, असेही त्यांनी सांगितले. काही कामगार, कर्मचारी फक्त रेकॉर्डवर असल्याची बाबही निदर्शनास आल्याचे म्हणत त्यांनी आरोग्याधिकारी, सहाय्यक आरोग्याधिकाऱ्यांना याबाबत लक्ष घालण्याची सूचना केली. 

कामगार- खर्चाची स्थिती 
-सध्या कार्यरत कामगार : ११८ 
-वाढीव कामगार : ४२ 
-एकूण कामगार : १६० 
-प्रतिदिवस रोजंदारी : ४०७ रुपये 
-मासिक खर्च : १९,५४,९४४ 
-१४ व्या वित्त आयोगातून खर्च मान्यता : ३,९४,४०,९५२ 

संपादन ः राजेश सोनवणे
 

loading image