
कोरोना संसर्गाच्या संकटामुळे सात-आठ महिने संपूर्ण आर्थिक उलाढाल ठप्प झाली होती. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक स्थितीवरदेखील विपरीत परिणाम झाला.
धुळे : कोरोनाच्या संकटाने सर्वसामान्यांच्या आर्थिक स्थितीवर पडलेल्या बोजाच्या पार्श्वभूमीवर दिलासा देण्यासाठी महापालिकेने मालमत्ता करावर थकबाकीवरील शास्ती माफीसाठी ‘अभय योजना‘ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या (ता.१) नवीन वर्षापासून ही योजना लागू होईल. या योजनेचा मालमत्ताधारकांनी लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.
कोरोना संसर्गाच्या संकटामुळे सात-आठ महिने संपूर्ण आर्थिक उलाढाल ठप्प झाली होती. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक स्थितीवरदेखील विपरीत परिणाम झाला. या पार्श्वभूमीवर मालमत्ता कराच्या अनुषंगाने सर्वसामान्य नागरिकांवर कोणताही अतिरिक्त दंडाचा (शास्ती) भार पडू नये, या दंडातून त्यांना दिलासा मिळावा यासाठी उद्या (ता.१) पासून थकीत मालमत्ता करावरील शास्ती माफीसाठी अभय योजना लागू करण्यात आल्याचे महापालिकेने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
१५ जानेवारीपर्यंत १०० टक्के सूट
अभय योजना १ ते १५ जानेवारी २०२१ या दरम्यान राबविण्यात येईल. या कालावधीत थकीत मालमत्ता करावरील शास्तीमध्ये मालमत्ताधारकांना १०० टक्के सूट देण्यात येईल. त्यानंतर १६ ते ३१ जानेवारी २०२१ या कालावधीत ५० टक्के सूट असेल. यापूर्वी कर अदा केलेल्या मालमत्ताधारकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
ॲपद्वारे भरा कर
नागरिकांनी मालमत्ता कर भरण्यासाठी ‘धुळे ई-कनेक्ट' या अँपचा (प्लेस्टोअर मधून डाऊनलोड करणे) वापर करून ऑनलाइन भरणा करण्याची सुविधाही उपलब्ध आहे. तसेच धनादेश अथवा रोख रक्कम महापालिकेच्या जुन्या इमारतीमधील बँकेच्या काउंटरवर भरता येईल. धुळे शहरातील सर्वसामान्य नागरिकांना नूतन वर्षाची ही भेट असून या योजनेचा लाभ घेऊन आपली संपूर्ण शास्ती माफ करून घ्यावी असे आवाहन महापौर चंद्रकांत सोनार, आयुक्त अजिज शेख, उपमहापौर कल्याणी अंपळकर, स्थायी समिती सभापती सुनील बैसाणे, महिला बालकल्याण समिती सभापती स्नेहल जाधव, उपसभापती रेखा सोनवणे, सभागृह नेते कांतिलाल दाळवाले, विरोधी पक्ष नेते साबीर शेठ, अतिरिक्त आयुक्त गणेश गिरी, उपायुक्त शांताराम गोसावी आदींनी केले आहे.
संपादन ः राजेश सोनवणे