
अनैतिक संबंधात बाधा येऊ नये; म्हणून खून झाल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. सुरूवातीला भावाच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद झाल्यानंतर अज्ञात संशयितांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल झाला. संशयीत चुलत भावास अवघ्या तीन दिवसात अटक करण्यात आली. अनैतिक संबंधातून खुनाचा संशय असा हा खुननाट्याचा घटनाक्रम आहे.
सोनगिर (धुळे) : सायने मल्हारपाडा (ता. धुळे) येथील एका युवकाचे झोपेत निधन झाल्याची घटना दर्शविण्यात आली होती. याबाबत पोलिसांना खबर देणारा मयताच्या चुलत भावानेच खुन केल्याचे तपासाअंती स्पष्ट झाले. अनैतिक संबंधासाठी खुन केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
रात्री केले नॉनव्हेज जेवण
सायने मल्हारपाडा येथील मयत बारकू झुलाल ठेलारी (वय 26) हा पत्नीसह वास्तव्यास होता. बारकूचे आई व वडील झुलाल नामदेव ठेलारी मेंढ्या चारण्यासाठी बाहेरगावी वाड्यावर रहातात. बारकू हा सोमवारी (ता. 18) सायंकाळी मित्रांसोबत शेतात आला. तेथे दारू पिऊन कोंबडीच्या मटणाचे जेवण केले. रात्री घरी परतल्यावर तो घरात एकटाच झोपला होता. पहाटे चारला त्याला त्याचे चुलत भाऊ गुढा हरी ठेलारी (वय 35) याने उठवले. मात्र तो न उठल्याने गुढा ठेलारीने येथील पोलिस ठाण्यात खबर दिली. त्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
गळ्यावर दिसले निशाण
बारकूचा मृतदेह त्याच्या वडीलांना पाहिला असता त्याच्या गळ्यावर खुणा दिसून आल्या. यानंतर त्याच्या वडीलांनी अज्ञात संशयितांनी खून केल्याची फिर्याद दाखल केली. त्यावरून अज्ञात खुनीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान पोलिसांनी चौकशीचे चक्र फिरवले असता सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांना तपासात अनैतिक संबंधातून खून झाल्याचे आढळून आले.
बारकूच्या पत्नीशी संबंध
बारकू ठेलारी याचा विवाह होवून आठ वर्ष उलटली होती. परंतु, त्यास मुलबाळ झालेले नव्हते. यामुळे बारकूपासून पत्नीला मुलबाळ होत नसल्याने गुढा ठेलारीने माझ्यापासून तुला मुलं होऊ शकते; असे पटवून बारकूच्या पत्नीशी अनैतिक संबंध ठेवले. तसेच बारकू झोपेत असताना त्याचा गळा दाबून खून केल्याचा संशय आहे. महिलेने गुढा यासोबत अनैतिक संबंध असल्याची कबुली दिल्याचे समजते; पण खुनाबाबत माहिती नसल्याचे तिचे म्हणणे आहे. याप्रकरणी गुढा ठेलारीस अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील करीत आहेत.
संपादन ः राजेश सोनवणे