
प्रातांधिकाऱ्यांच्या बंगल्यातून किती ऐवज गेला यापेक्षा बड्या अधिकाऱ्यांच्या घरीच चोरीच्या घटनेने चोरट्यांना पोलीसांचा धाक किती असा प्रश्न उभा राहिला आहे.
धुळे : सर्वसामान्य नागरिकांच्या घरात चोरट्यांनी डल्ला मारण्याचे प्रकार थांबत नसतांना खुद्द पोलीस अधिकाऱ्यांच्या घरातूनही चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास करण्याची घटना धुळ्यात घडली. ही घटना विस्मृतीत जात नाही; तोच थेट प्रांताधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानात चोरटे शिरल्याने खळबळ उडाली. प्रातांधिकाऱ्यांच्या बंगल्यातून किती ऐवज गेला यापेक्षा बड्या अधिकाऱ्यांच्या घरीच चोरीच्या घटनेने चोरट्यांना पोलीसांचा धाक किती असा प्रश्न उभा राहिला आहे.
धुळ्याचे प्रांताधिकारी भिमराज दराडे यांचे शहरातील संतोषी माता चौक ते गणपती मंदिरादरम्यानच्या रस्त्यावर अंध मुलांच्या शाळेसमोर शासकीय निवासस्थान आहे. श्री. दराडे भाचीच्या लग्नासाठी शुक्रवारपासुन नगर येथे गेले आहेत. त्यामुळे त्यांचे निवासस्थान बंद होते. बंद घरात रात्री चोरटे शिरल्याची बाब सकाळी उघडकीस आली.
उपजिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आली बाब
निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांचे शासकीय निवासस्थान श्री. दराडे यांच्या निवासस्थानाजवळ आहे. श्री. गायकवाड सकाळी उठल्यानंतर त्यांच्या बंगल्याच्या मागच्या बाजूला गेले. त्यावेळी त्यांना वॉलकंपाऊंडला मोठी शिडी लावल्याचे निदर्शनास आले. सायंकाळपर्यंत येथे ही शिडी नव्हती; मग सकाळी आली कुठुन असा प्रश्न श्री. गायकवाड यांना पडला व नेमके काय घडले हे पाहण्यासाठी विचारपूस करत ते श्री. दराडे यांच्या निवासस्थापर्यंत आले. तेथे श्री. दराडे यांच्या घराचा लोखंडी दरवाजाचा कडीकोयंडा तुललेला आढळुन आला. ही घटना त्यांनी लागलीच शहर पोलीसांना कळविली. पोलीस निरिक्षक नितिन देशमुख, एपीआय श्रीकांत पाटील, मुक्तार मन्सुरी, पंकज खैरमोडे, विलास पाटील आदींचे पथक घटनास्थळी दाखल झाले. चोरट्यांनी श्री. दराडे यांच्या घरातील सामान अस्तव्यस्त केलेला, तसेच देवघरातील मुर्ती देखील इतरत्र ठेवलेल्या आढळुन आल्या. एक सुटकेसही चोरट्यांनी उघडल्याचे दिसुन आले. पहाटेच्या सुमारास चोरटे श्री. दराडे यांच्या घरात शिरले असावेत असा अंदाज आहे.
संपादन ः राजेश सोनवणे