
लग्नाला दहा वर्ष झाले असताना सुरवातीला चांगली वागणूक मिळाली. परंतु, देराणीला नोकरी लावायची म्हणून पैसे कमी पडतात. यामुळे दोन लाख रूपये आणण्यासाठी पतीकडून पत्नीचा छळ सुरू झाला. यासोबतच सासरच्या आणखी काही मंडळींकडून देखील हा त्रास सुरू झाला.
चिमठाणे (धुळे) : शिंदखेडा येथील माहेरवाशीण व शेंदुर्णी (ता. जामनेर, जि. जळगाव) येथील सासर असलेल्या विवाहितेस माहेरून देराणीस नोकरी लावण्यासाठी दोन लाख रुपये आणले नाहीत म्हणून पतीसह नऊ जणांनी छळ केल्याने शनिवारी (ता. १६) शिंदखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
शिंदखेडा शहरातील गांधी चौकातील पूजा कासार (वय ३१) चे लग्न दत्तात्रेय दिलीप कासार (रा. शेंदुर्णी, ता. जामनेर) यांच्याशी १९ डिसेंबर २०१० ला शिंदखेडा येथे झाले. त्यांना मुलगी हेतल व मुलगा चिन्मय असे दोन मुले आहेत. सासरच्यांनी सुरवातीला चांगली वागणूक दिली. नंतर देराणीस नोकरीसाठी माहेरून दोन लाख रुपये आणावेत म्हणून पती दत्तात्रेय कासार (रा. मुंबई), सासू मंगला कासार, सासरे दिलीप कासार, चुलतसासू चित्रा कासार, चुलतसासरे अशोक कासार (सर्व रा. शेंदुर्णी, ता.जामनेर), चुलत जेठ प्रशांत कासार, चुलत जेठाणी गीता कासार (रा. ठाणे), नणंद जयश्री कासार (रा. मलकापूर) व दीर प्रकाश कासार(रा. शेंदुर्णी ता.जामनेर) वेळोवेळी पैशांची मागणी करून शारीरिक व मानसिक छळ करीत होते. पती अंधेरी येथे इंजिनिअर म्हणून नोकरीस असून, त्यांच्या छळाला कंटाळून पूजा यांनी शिंदखेडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून पतीसह नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला.