esakal | भरडधान्य खरेदीस मुदत वाढवून द्या; शेतकऱ्यांसह शेतकरी संघाची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

coarse grains

केंद्राच्यावतीने आधारभूत किंमत योजनेखाली राज्यात भरडधान्य खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. हे केंद्र येथील शेतकरी सहकारी संघामार्फत सुरू करण्यात आले होती.

भरडधान्य खरेदीस मुदत वाढवून द्या; शेतकऱ्यांसह शेतकरी संघाची मागणी

sakal_logo
By
धनंजय सोनवणे

साक्री (धुळे) : केंद्र शासनाच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या भरड धान्य खरेदी केंद्रास मुदत वाढवून द्यावी, तसेच धान्य खरेदीचे उद्दिष्ट देखील वाढवून द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांसह शेतकरी सहकारी संघातर्फे करण्यात आली आहे. याबाबत खासदार डॉ. हिना गावित यांना निवेदन देण्यात आले आहे. 

केंद्राच्यावतीने आधारभूत किंमत योजनेखाली राज्यात भरडधान्य खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. हे केंद्र येथील शेतकरी सहकारी संघामार्फत सुरू करण्यात आले होती. यासाठी ऑनलाइन नोंदणी करत मक्यासाठी ९३०, ज्वारीसाठी ६३, तर बाजरीसाठी पाच शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. पहिल्या टप्प्यात केवळ १४९ शेतकऱ्यांची मक्याची, तर ६२ शेतकऱ्यांनी ज्वारीची मोजणी केली. मात्र अवकाळी पाऊस, रब्बीची मशागत यासह विविध अडचणींमुळे अनेक शेतकऱ्यांचे धान्य मोजले न गेल्याने मुदत वाढवून देत १५ जानेवारीपासून दुसऱ्या टप्प्यात खरेदीस सुरुवात करण्यात आली होती. शेतकऱ्यांची मोठी संख्या आणि ३१ जानेवारी ही अंतिम मुदत असल्याने खरेदी केंद्रावर मोठी गर्दी होऊन, धान्य भरून आलेल्या ट्रॅक्टरच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. 

शेतकऱ्यांच्या घरात धान्य पडून
दरम्यानच्या काळात अधिकाधिक शेतकऱ्यांचे धान्य खरेदी व्हावे यासाठी मार्केटिंग फेडरेशन, प्रशासन तसेच शेतकी संघ यांनी वजन काटे वाढवून, अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करत धान्य खरेदीचा प्रयत्न केला. मात्र निर्धारित मुदतीत सर्व शेतकऱ्यांची खरेदी होऊ शकलेली नाही. यात ३१ जानेवारीपर्यंत १०,१३४ क्विंटल मका, ६१.५० क्विंटल ज्वारी व ७.५० क्विंटल बाजरी खरेदी झाली आहे. तरी देखील अजूनही शिल्लक राहिलेल्या शेतकऱ्यांच्या धान्याच्या खरेदीसाठी मुदत तसेच उद्दिष्ट वाढवून द्यावे यासाठी शेतकी संघासोबत शेतकऱ्यातर्फे खासदार डॉ. हिना गावित यांना निवेदन पाठवत मागणी करण्यात आली आहे. 

भरडधान्य खरेदीसाठी सबएजंट संस्था म्हणून काम करत असताना शेतकरी सहकारी संघातर्फे अधिकाधिक शेतकऱ्यांचे धान्य मोजण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. यासाठी शेतकरी, स्थानिक प्रशासनासोबतच मार्केटिंग फेडरेशनच्या वरिष्ठांचे देखील सहकार्य मिळाले. अखेरच्या टप्प्यात अतिरिक्त उद्दिष्ट देखील वाढवून मिळाले होते. मात्र तरी देखील अजूनही २०-२५ टक्के शेतकऱ्यांचे धान्य खरेदी होऊ शकलेले नाही. सध्या शासनाच्या सूचनेनुसार निर्धारित मुदतीनंतर खरेदी केंद्र बंद करण्यात आले आहे, मात्र शासनाकडून याबाबत निर्देश मिळाल्यास उर्वरित शेतकऱ्यांचे धान्य खरेदीसाठी देखील प्रयत्न केला जाणार आहे. 
- विलासराव बिरारीस, चेअरमन, शेतकरी सहकारी संघ, साक्री 

संपादन ः राजेश सोनवणे