अजबच त्‍यांची प्रेमकहाणी..पोलिस भरतीसाठी आलेला ‘तो’ फेसबुक फ्रेंड; तिने ओळख दिली अन्

जगन्नाथ पाटील
Monday, 5 April 2021

एका कामानिमित्त सागर सुरतहून पुणे येथे आला. शिवालीने त्याला ओळखले. चार वर्षांच्या फेसबुक मैत्रीचे रुपांतर विवाहात करण्याचे ठरले. अन्‌ दोघांच्या साताजन्माच्या गाठी नुकत्याच बांधल्याही गेल्यात.

कापडणे (धुळे) : स्वर्गात विवाहाच्या गाठी ब्रम्हदेवाने अगोदर बांधून ठेवलेल्या असतात असे सांगितले जाते. पण सागर आणि शिवालीच्या ब्रम्हगाठी फेसबुक या सोशल मिडीयावर बांधल्या गेल्यात. एका कामानिमित्त सागर सुरतहून पुणे येथे आला. शिवालीने त्याला ओळखले. चार वर्षांच्या फेसबुक मैत्रीचे रुपांतर विवाहात करण्याचे ठरले. अन्‌ दोघांच्या साताजन्माच्या गाठी नुकत्याच बांधल्याही गेल्यात.

फेसबुकवर केवळ लाईक अॅंड कॉमेंटस
गरताड (ता.शिरपूर) येथील आणि सुरतला रहिवास असलेला सागर पाटील आणि पिंपरी चिंचवड येथील शिवाली मोहने हे दोघे चार वर्षांपुर्वी फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्टवरुन फ्रेंड झाले. दोघेही एकमेकांच्या पोस्टला लाईक व कॉमेंटस करीत होते. त्यावेळी त्यांच्यात आभासीच मैत्री होती. पण विचार जुळत गेलेत. मैत्रीत कसे रुपांतर झाले. ते त्यांना कळलेही नाही. मात्र मैत्री गहन झाल्याची कल्पना त्यांना आली होती.

पुण्यात पोलिस भरती अन्‌...
दोन वर्षांपुर्वी पुण्यात पोलिस भरतीसाठी सागर दाखल झाला. भरतीपुर्व मेडीकल सुरु होते. शिवालीचे बीएस्सी नर्सींग झाले होते. जॉबला होती. तरुणांचे मेडिकल करीत असलेल्या डॉक्टरांच्या टीममध्ये ती होती. या दरम्‍यान तिने सागरला ओळखले. पण सागरने तिला ओळखले नाही. कारण शिवालीचे छायाचित्र फेसबुकला नव्हतेच. शिवालीने स्वतःहून ओळख करून दिली. तेथून त्यांच्या प्रेम कहाणीला सुरूवात झाली.

गरताड व्हाया सुरत पुणे एक्सप्रेस
प्रेमाचा सागर आणि प्रेममुर्ती शिवाली दोघांची प्रेम कहाणी विवाहाच्या चौकटीकडे सरकू लागली. प्रारंभी असे कुठे असते का, असे म्हणत दोन्ही कुटूंबांनी नकारच दिला. मात्र गरताड व्हाया सुरत पुणे एक्सप्रेस अधिकच वेगाने धावत होती. त्यांनी आईवडिलांना विश्वासात घेत विवाहाची निश्चिती केली.

चार वर्षांनंतर विवाह बंधनात
चार वर्षांनंतर पिंपरी चिंचवडमध्ये मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत नुकतेच चतुर्भुज झालेत. त्यांच्या विवाहबंधनातील प्रवास फुलावा यासाठी सोशल मेडियावर शुभेच्छांची मनसोक्त बरसात होत आहे.

संपादन– राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi dhule news facebook friend love and marriage